Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत जोरदार ड्रामा झाला. पक्षाचे नेते आणि मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यावेळी भाषणाच्या दरम्यान अश्रू अनावर झाले. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पाटील यांनी या भाषणातही तसे स्पष्ट संकेत दिले. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील या भाषणामध्ये चांगलेच भावुक झाले होते. राष्ट्रवादीच्या बैठकीत भाषण करताना ते म्हणाले, मी कधीही जयंत पाटील संघटना तयार केली नाही. स्वत:ची ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. जयंत पाटील फाऊंडेशन मी कधीही केलं नाही.
मी कायम ज्या पक्षात आपण आहोत त्यात राहायचं, दुसरं काहीच नाही. साहेब जो निर्णय देतील त्यावर काम करायचं हेच धोरण राहिलं आहे. मी राष्ट्रवादीपासून लांब जाईन असा विचार करू नका, प्रदेशाध्यक्षांना 2 वर्षांचा कालावधी असतो. पण, मला पवार साहेबांनी 7 वर्ष संधी दिली. मी पदावरुन बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Ravindra Chavan: 'शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वाईट वाटलं', चव्हाण यांनी पहिल्यांदाच सांगितलं नाराजीचं कारण )
पक्षासाठी काम करत असताना माझ्या विरोधी बऱ्याचं कारवाया लागल्या. त्याला मी उत्तर दिल नाही. मी दबाव सहन न करता साहेबांनी दिलेला आदेश पाळला, असं सांगताना पाटील यावेळी चांगलेच भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.
नवा अध्यक्ष जो कुणी असेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहूया, नवा अध्यक्ष नवी टीम महाराष्ट्रामध्ये उभी करेल. अनेक आव्हानं आहेत, पण शरद पवारांबद्दल आजही लोकांना आकर्षण आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मी जातोय पण....
आमच्या चुका सुप्रिया सुळे यांनी पोटात घेतल्या. हा शेवट नाही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. मुख्य सेनापती होतो पण, सेना अजूनही सज्ज आहे. मी जातोय पण सोडत नाही.... नाव असेल किंवा नसेल कामातून ओळख मिळेल कारण मी जयंत आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.