करायला गेले एक आणि.... जितेंद्र आव्हाडांना माफी का मागावी लागली?

Jitendra Awhad Apology : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणावर सध्या राजकारण तापलंय. या प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाडमधील चवदार तळ्याच्याकाठी आंदोलन केलं. हे आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचं उघड झालं. त्यामुळे आव्हाड यांना माफी मागावी लागली आहे.

चवदार तळ्याच्याकाठी आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी केला. या प्रकरणात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आव्हाड प्रसिद्धीसाठी हे आंदोलन करत असल्याची टीका परांजपे यांनी केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आव्हाड यांना बॅकफुटवर येत माफी मागावी लागली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आव्हाड?

'शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो.

गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे.डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे.

( नक्की वाचा : 'मी सुप्रियाताईंमुळे पक्ष सोडला', पवारांच्या 'लेडी जेम्स बॉन्ड'नं सांगितली परिस्थिती )
 

मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही.मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे.मात्र आज मी माफी मागतोय,कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील,हा विश्वास आहे,'

अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. त्यांनी तसा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केलाय.

( नक्की वाचा : 'शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत', अजित पवारांचा थेट निशाणा )
 

विरोधक आक्रमक 

आव्हाड यांच्या कृतीचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या या कृतीचा निषेध केलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आव्हाडांवर टीका केलीय. 'प्रसिध्दीसाठी स्टंट करताना अनेक लोक भान हरपतात तसेच जितेंद्र आव्हाड यांचे आज भान हरपले होते. प्रसिध्दीसाठीचे स्टंट आणि उथळपणा अंगलट येतो. जितेंद्र आव्हाड यांचे तसेच झाले असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्यांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही,' असा टोला आठवले यांनी लगावलाय. 
 

Advertisement