32 वर्षानंतर विस्थापित काश्मिरी पंडितांनी अनंतनागमध्ये बजावला मतदानाचा हक्क

निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्यात काश्मीरच्या बारामुल्लाचा समावेश होता. पाचव्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये ५५.७९ टक्के मतदान झाले होते. गेल्या ८ लोकसभा निवडणुका आणि ३५ वर्षात इतके जास्त मतदान कधीच झाले नव्हते.

Advertisement
Read Time: 2 mins
अनंतनाग:

शनिवारी म्हणजेच 25 मे रोजी लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज ज्या मतदारसंघांसाठी मतदान पार पडले त्यामध्ये अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या निवडणुकीच्या निमित्ताने विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना ३२ वर्षानंतर अनंतनागमध्ये मतदानाचा हक्क बजावता आला.  काश्मीरमधल्या बदललेल्या परिस्थितीमुळे अनंतनागमध्ये येऊन मतदान करणे शक्य झाले अशी प्रतिक्रिया वीर सराफ यांनी एएनआयशी बोलताना दिली. मतदानाचा हक्क बजावता आल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला. सराफ यांनी म्हटले की,"मी काश्मीरमध्ये ३२ वर्षांनंतर मतदान केले आहे. मी अल्पसंख्याक समुदायातील आहे जो सहसा येथे येत नाही. परंतु गेल्या दहा वर्षांत काश्मीरमधील परिस्थिती बदलली असून यामुळे आम्ही इथे येऊन मतदान करू शकलो."

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मतदानासाठी आलेल्या कश्मिरी पंडितांपैकी एक असलेल्या वीर सराफ यांनी म्हटले की हा प्रदेश म्हणजे आमची मातृभूमी आहे. आम्ही आमच्या मातृभूमीची पूजा करतो. त्यामुळे मातृभूमीत येऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा आनंद हा वेगळाच आहे. अनंतनाग-राजौरी मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार होतं मात्र दळणवळण, संचार आणि नैसर्गिक बाधांमुळे ही तारीख बदलून २५ मे करावी लागली होती. 

अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने इथून मियां अल्ताफ अहमद आणि अपनी पार्टीने जफर इक्बाल मन्हासना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. काश्मीरी पंडितांनी अनंतनागमध्ये येऊन मतदान करणं गेल्या अनेक वर्षांपासून बंद केलं होतं. या निवडणुकीत मात्र चित्र बदललेलं असून, वीर सराफ यांच्याप्रमाणे बऱ्याच काश्मीरी पंडितांनी अनंतनागमध्ये येऊन मतदान केले. काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. 

निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्यात काश्मीरच्या बारामुल्लाचा समावेश होता. पाचव्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये ५५.७९ टक्के मतदान झाले होते. गेल्या ८ लोकसभा निवडणुका आणि ३५ वर्षात इतके जास्त मतदान कधीच झाले नव्हते. जम्मू काश्मीरमध्ये ५ टप्प्यात मतदान पार पडेल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article