मनोज जरांगे 'राजकोट'ला जाणार, वातावरण आणखी तापणार?

1 सप्टेबरला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राजकोटवर जाणार आहेत. त्यामुळे इथलं वातावरण आणखी चिघळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. अनेक नेत्यांनी राजकोटला भेटी दिल्या. अनेकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. खासदार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे नेतेही राजकोटवरच भिडले. त्यावेळी जोरदार राडाही झाला. पोलीसांनी कसाबसा मार्ग काढत वाद मिटवला. आता 1 सप्टेबरला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राजकोटवर जाणार आहेत. त्यामुळे इथलं वातावरण आणखी चिघळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील हे  1 सप्टेबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत.  छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.  राजकारण करायला भरपूर जागा आहे. असंही जरांगे यांनी ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातमी - राजकोटवर फुल टू राडा! नारायण राणे म्हणतात 'घरातून खेचून रात्रीत मारून टाकेन'

खासदार नारायण राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या राजकोटवर पाहाणीसाठी पोहोचले होते. त्याच वेळी महाविकास आघाडीचे नेते राजकोटवर पोहोचले. त्यात आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय विडेट्टीवार, जयंत पाटील हे सर्व नेते एकत्रीत त्याच वेळी पोहोचले. त्यामुळे गोंधळ उडाला. मविआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. गडावर तणाव निर्माण झाला. त्यात खासदार नारायण राणे यांचा संताप अनावर झाला. पुढे गडावर जोरदार राडा झाला. त्यात राणे यांनी घरातून खेचून मारेन या वक्तव्यामुळे तर आणखी वाद पेटला. त्यात आता जरांगे हे राजकोटवर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री म्हणाले, पुतळा कोसळण्यासाठी वारा दोषी; पण काय आहे परिस्थिती? स्थानिकांचा खुलासा

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी या आधी नारायण राणे असो किंवा त्यांची दोनही मुले असो यांना फोन वरून अनेक वेळा सुनावले आहे. त्याच्या अनेक क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यात जरांगे हे राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात जात आहेत. त्यामुळे त्यांना राणे समर्थक विरोध करणार का हा प्रश्न आहे. तसे झाल्यास सिंधुदुर्गात वातावरण आणखी बिघडू शकते.  दरम्यान  मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा शेतीचा पाणीप्रश्न निकाली लागला पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले. जालन्यातील अंबडमध्ये जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीच्या जनसंवाद यात्रेचा समारोप पार पडला त्यानंतर ते बोलत होते. 
 

Advertisement