मराठा आरक्षणामध्ये सगे सोयऱ्यांचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालं आहे.जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या या उपोषणाचा आज (गुरुवार, 13 जून) सहावा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली होती. अखेर राज्य सरकारची मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे पाटील यांनी एक महिन्यांसाठी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकारकडून काय आश्वासन?
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं ही विनंती करण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांचं शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये आलं होतं. यापूर्वी छत्रपती संभाजीनगचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सगेसोयऱ्यासह मराठा आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलाय. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यात येईल. यावरील हरकती मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येतील. याबाबतच्या सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता लवकर करण्यात येईल, असं आश्वासन शंभुराजे देसाई यांनी दिलं. त्याचबरोबर याबाबत जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होईल असंही देसाई यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : जरांगेंनी गंभीर आरोप केलेला मुख्यमंत्र्यांचा तो OSD कोण? )
सरकारला अल्टीमेटम
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी हे उपोषण 13 जुलैपर्यंत स्थगित केलं आहे. येत्या 30 जूनपर्यंत सर्व गोष्टींची रितसर पूर्तता करावी असं जरांगे यांनी सरकारला यावेळी सांगितलं.मराठा आंदोलनाच्या काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली. पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असं देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )
सरकारवर केला होता आरोप
जरांगे पाटील यांनी यापूर्वी 'चर्चा करून गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा अंदाज दिसतो,' असा गंभीर आरोप सरकारवर केला होता. माझ्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसून मला खेळवणं सुरु आहे. सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठा समाज चांगला हिसका दाखवेल, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये हे उपोषण मागं घेण्यासाठी सरकारी पातळीवरुन जोरदार प्रयत्न झाले, त्याला अखेर यश आलं आहे.