मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा तापला आहे. याची झलक आज पाहायला मिळाली. 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे पाटल यांनी दिला आहे. बीडच्या मांजरसुंब्यात झालेल्या सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं आहे. बीडच्या मांजरसुंब्यात मराठ्यांची इशारा सभा पार पडली. याच सभेतून मराठा समाजाला 29 ऑगस्टला मुंबईत धडकण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं.
या इशारा सभेत बोलताना जरांगे यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत जायचं असं ते म्हणाले. याच इशारा सभेतून मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका असा असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले. सत्तेच्या जीवावर उड्या मारू नका. आता कोणत्या ही स्थितीत माघार नाही. आरक्षण घेतल्या शिवाय आता मागे फिरायचं नाही. गुलाल उधळतच परत यायचं असा निर्धारही यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.
नक्की वाचा - Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांना नेमके काय हवे आहे? आंदोलनाची तयारी कशी?
2 वर्षानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा इशारा दिला आहे. यावेळी अवघ्या 2 दिवसातच मुंबईत धडकण्याच्या सूचना मराठा समाजाला त्यांनी केल्या आहेत. 27 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून ते निघणार आहेत. त्यानंतर
- शहागड, बीड मार्गे
- पैठण, संभाजीनगर मार्गे
- अहिल्यानगर मार्गे
- आळेफाटा, पुणे
27 ऑगस्टच्या रात्री शिवनेरी दर्शन आणि तिथेच मुक्काम
28 ऑगस्टला माळशेज घाट
- कल्याण मार्गे
- वाशी मार्गे
- चेंबूर मार्गे
28 ऑगस्टचा रात्रीचा मुक्काम आझाद मैदान मुंबईत
29 ऑगस्टला मंत्रालयावर धडकणार
2 वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईच्या वेशीवरूनच म्हणजेच वाशीतून हे वादळ मागे धाडण्यात यश आलं होतं. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. जरांगेंचा यावेळीचा मुंबई मोर्चा हा उत्तर महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने सरकणार आहे. यासाठी गावोगावी घोंगडी बैठका देखील होत आहेत. विरोधी आमदार तर सहभागी होतायतच, पण सत्ताधारी आमदार देखील जरांगेंच्या या आंदोलनाला समर्थन देताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीस जरांगेंचं हे आंदोलन कुठे आणि कसं क्षमवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.