Raj Thackeray Mira Road rally : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा कम्पलसरी करुन दाखवावी. आम्ही फक्त दुकानंच नाही तर शाळाही बंद करु, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांचं शुक्रवारी (18 जुलै) मीरा रोडमध्ये भाषण झालं. त्यामध्ये ते बोलत होते.
हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. हळूहळू सर्व गोष्टी करुन मुंबईत ताब्यात घ्यायची आणि ती गुजरात मिळवायची असं त्यांचं स्वप्न आहे, असा आरोप राज यांनी या भाषणात केला. गुजराती नागरिकांनी बिहारींना मारलं त्याच्या बातम्या झाल्या का? इथं एका मिठाईवाल्याच्या कानफडात मारलं तर देशाची बातमी बनते? असा सवाल त्यांनी केला.
हिंदी भाषेला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, वर्ष झालंय पण एक रुपया दिलेला नाही. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांचं भलं झालं, अन्य कुणाचं भलं झालं ते मला सांगा ? हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालं आहे? त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय? अशी टीका राज यांनी केली.
( नक्की वाचा : Uddhav Thackeray : 'यह अंदर की बात है' फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंचं उत्तर )
तर नाही बोलणार जा...
हिंदी भाषेनं 250 भाषा मारुन टाकल्या. बिहारमध्ये त्यांनी हिंदी भाषा स्वीकारली. तिथं आजही 99 टक्के लोकं मातृभाषा बोलतात.भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदीही वाईट भाषा नव्हे, आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्यातून तुम्ही हिंदी लादणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही. पालघरसह मीरा रोडपर्यंतचा संपूर्ण पट्टा हिंदी भाषिक करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामाध्यमातून हा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोप राज यांनी केला.
( नक्की वाचा : Raj Thackeray : 'दुबे मुंबई मे आना, डुबे, डुबे के मारेंगे', राज ठाकरेंचं भाजपा खासदाराला आव्हान पाहा Video )
आम्ही गुलाम नाही. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. मराठे अटकेपार पोहोचले होते, हा इतिहास आहे. तो महाराष्ट्र हतबल आहे का? बाकीचे माणसं बाहेरुन आले ती तुमच्यासमोर रुबाब करणार... स्वत:हून काही करण्याची गरज नाही. पण, असा कुणी माज घेऊन आला तर त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.