कल्याण शिळ रस्त्यावर एकीकडे मेट्रोचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे पलावा जंक्शन पुलाचे काम सुरू आहे. ही कामे दोन वर्षापासून सुरू आहेत. ही कामे झाली तर वाहतूक कोंडीतून वाहनचालकांसह नागरिकांची ही सुटका होणार आहे. मात्र पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका चाकरमान्यांना, वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र हे काम काही मार्गी लागत नाही अशी स्थिती आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या देसाई खाडीवरील पूल तसेच पलावा जंक्शन परिसरातील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. धक्कादायक म्हणजे देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करीत होते, असा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्री पूल, दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणा केला जात आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे असे पाटील म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत, ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वाचा का?
जिंदाल यांनी देखील कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदाराला त्यांनी खडे बोल सूनावले आहेत. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. कामात जो विलंब होत आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही दंड ठोठवणार आहोत असे जिंदाल यांनी सांगितले. काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे. नाहीतर कारवाई करणार असा सज्जड दम ही त्यांनी भरला आहे . यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाणपूल कामा आड येणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे बेकायदा बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. आता तरी कल्याण शीळ रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या कामांना वेग येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.