Rahul Gandhi Budget Speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना भाजपानं चक्रव्युहमध्ये अडकवलं आहे, असा त्यांनी आरोप केला. महाभारतामध्ये अभिमन्यूबरोबर जे झालं होतं, तेच आज भारतीयांसोबत केलं जात आहे, असा त्यांनी दावा केला. लोकसभेत बजेटवरील चर्चेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भाजपाला इंटर्नशिप के पेपर लीक प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा खासदारांनी अनेक वेळा राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर लोकसभेत दोन्ही बाजूंनी जोरदार गदारोळ झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशभरात 'कर दहशतवाद'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बजेटवरील चर्चेत भाग घेताना सांगितलं की, 'या सरकारच्या कार्यकाळात संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते देखील घाबरलेले आहे. या बजेटचा हेतू फक्त एकाधिकार असलेले उद्योगपती, एकाधिकार असलेले राजकारणी आणि एजन्सींना भक्कम करण्याचा आहे. देशभरात 'कर दहशतवाद' आहे.
हा दहशतवाद रोखण्यासाठी बजेटमध्ये काहीही करण्यात आलेलं नाही. बजेटमध्ये अर्थमंत्री 'पेपर लीक' वर एक शब्दही बोलल्या नाहीत. गेल्या 20 वर्षांमध्ये शिक्षणावर सर्वात कमी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे.'
( नक्की वाचा : 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल )
'देश चक्रव्युहात अडकला'
राहुल गांधी यावेळी बोलताना पुढं म्हणाले की, 'देशातील नागरिकांना भाजपानं एका चक्रव्युहात अडकवलं आहे. चक्रव्युहाचं आणखी एक रुप आहे, पद्मव्यूह जे लोटसव्यूहमध्ये होतं. हे व्यूह 6 जणं नियंत्रित करत आहेत. या बजेटमध्ये सरकारनं मध्यमवर्गाचा विश्वासघात केलाय. आता मध्यमवर्ग सरकारची साथ सोडून 'इंडिया' आघाडीसोबत येत आहे.'