शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. त्यातील अनेक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. काही जण शिंदेंनी दिल्ली आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही उपस्थित होते. तर काहींनी शिंदेंच्या सत्कारालाही उपस्थिती लावली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची एक बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काय काय झालं याची माहितीच खासदार संजय दिना पाटील यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बैठक झाल्यानंतर खासदार संजय दीना पाटील यांनी याबाबत माहिती दिली. आमची पक्षाची संघटनात्मक बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. आमचे कुठलेही खासदार नाराज नाहीत. ते कुठेही जाणार नाही. असं पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवाय माझ्याबद्दल ज्या काही बातम्या सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. आम्हाला कोणीही संपर्क केला नाही. नाही आम्ही कोणाला संपर्क केला, असं स्पष्ट करत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकत्र आहेत. त्यांच्यात नाराजी नाही हे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीबाबतही पाटील यावेळी म्हणाले. ज्यावेळी हा सत्कार झाला त्यावेळी आपण महाराष्ट्र सदनातच होतो. त्यांचा सत्कार तिथे होणार आहे हे आपल्याला माहित नव्हतं. शिवाय त्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदारांची बैठकही महाराष्ट्र सदनमध्ये होती असंही ते म्हणाले. शरद पवारही त्या बैठकीला आले होते. दिल्लीत राज्यातले खासदार एकमेकांना भेटत असतात. काहींच्या घरी पुजा होती त्यासाठी सर्व जण एकत्र आले होते. त्यात गैर असे काही नाही असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आपण नाही, असं संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे असंतुष्ठ आहेत. ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत या सर्व गोष्टीवर पाटील यांनी पडदा टाकला. गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी चर्चा होती. त्यामुळे ठाकरेंनीच याबाबत पुढाकार घेत आपल्या खासदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांनी मातोश्रीवर बैठकीचे आयोजन केले होते.