चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी खाजगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार झाला तेव्हा खासदार प्रतिभा धानोरकर या तिथेच होत्या. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या या घटनेनंतर उलटसुलट चर्चा राजकीय वर्तूळात रंगल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे.या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ही आहेत.यावर तोडगा निघावा यासाठी खासदार धानोरकर या व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या बरोबर कार्यकर्ते होते. शिवाय त्यांचा भाऊ प्रवीण काकडे ही उपस्थित होता.चर्चा सुरू असतानाच अचानक अधिकाऱ्यांवर कार्यकर्ते भडकले. काकडे त्यात आघाडीवर होते. बाचाबाची सुरू असताना शिवागाळही केली गेली. यात एका कार्यकर्त्याने अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावले. त्यामुळे वातावरण तापले आणि एकच गोंधळ उडाला.
ट्रेंडिंग बातमी - रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं जाणार?
पोलिसांना परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी तातडीने परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी पावलं उचलली.पण कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संबधित अधिकाऱ्याला कार्यालयातून सुरक्षित बाहेर काढण्याचे ठरलले. त्यानुसार त्यांना कसेबसे बाहेर काढले गेले. या झालेल्या प्रकाराबाबत कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र झालेल्या प्रकाराची जोरदार चर्चा सध्या चंद्रपूरमध्ये आहे.