- महाराष्ट्राच्या इतिहासात हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रथमच नसणार
- विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
- अधिवेशनात विरोधकांच्या हाती सरकार विरोधात महत्वाचे विषय.
हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत याची चुणूक दाखवली आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक म्हणावं लागणार आहे. त्याला करण ही तसेच आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या या अधिवेशना विधी मंडळाच्या दोन्ही ही सभागृहात प्रथमच विरोधी पक्षनेते असणार नाहीत. असं ही पहिल्यांदाच घडत आहे. या आधी असं कधी ही घडलं नव्हतं. विधानसभा आणि विधान परिषदेत या अधिवेशनात विरोधी पक्षनेते असणार नाहीत. त्यातच विरोधकांच्या हाती असे काही महत्वाचे पाच मुद्दे लागले आहेत ज्यामुळे हे अधिवेशन नक्कीच गाजणार आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नसणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत आस्ते कदमची भूमिका दिसून आली आहे. या आधी असं कधीच घडलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची गरज आहे असं सत्ताधाऱ्यांकडून सतत सांगितलं जात आहे. पण त्यात तथ्य नाही असं विरोधकांनी सांगितलं. या आधी ही संख्याबळ नसतानाही विरोधकांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आल्याचं काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव आला आहे असं विधान परिषदेच्या सभापतींनी सांगितलं.योग्यवेळी निर्णय घेऊ असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेता नसला तरीही विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट या मुद्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही, तर पीकविम्याचे मुद्देही प्रलंबित आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखत आहेत. सरकार आचारसंहितेचा दाखला देत बचावात्मक भूमिका घेणार की काही ठोस निर्णय जाहीर करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सरकारला नव्या घोषणा करता येणार नाहीत.
विरोधकांच्या हाती गेमचेंजर मुद्दे
- 1) तपोवनमधील वृक्षतोडीचा वाद
- 2) मतदार यादी आणि दुबार मतदार
- 3) निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकाचा घोळ
- 4) पुण्यातील कथित जैन बोर्डिंग घोटाळा
- 5) पार्थ पवारांचा कथित महार वतनाच्या जमिनीचा घोटाळा
- 6) कायदा सुव्यवस्था आणि महिला अत्याचाराचा मुद्दा
- 7) बीडमधील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण
- 8) राज्यावरील कर्जाचा डोंगर,
- 9) शेतकऱ्यांना अपुरी मदत आणि कर्जमाफीचा मुद्दा
अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशन तापणार आहे. विरोधकांच्या हाती सत्ताधाऱ्यां विरोधात मोठा दारूगोळा आहे. त्याचा ते कशा पद्धतीने वापर करतात हे पण तितकेच महत्वाचे आहे. अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी गटातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारला घेरण्याची कसून तयारी करण्यात आली आहे. पण सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकणार की सहीसलामत बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.