शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वाद चांगलाच पेटला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य पक्षाच्या नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसे न केल्या आम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल असा इशाराच दिला आहे. त्यात भर म्हणून की काय शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी टोकाला पोहोचण्याची शक्तता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपले कधीही पटले नाही. जरी आम्ही आज कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी, कॅबिनेट संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर येतो त्यावेळी उलट्या होतात. येवढ्या टोकाचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपले कधीही पटू शकत नाही. एक कडवट शिवसैनिक म्हणून आपली ही भावना आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीला सतत आपण विरोध करत आलो आहोत असे वक्तव्य आरोग्या मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
'सावंत यांची हाकालपट्टी करा'
तानाजी सावंत यांच्या यावक्तव्याचा चांगलाचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेतला आहे. तानाजी सावंत यांची बोलणी खाण्यासाठी आम्ही महायुतीत आलेलो नाही. सावंत हे जाबाबदार मंत्री आहेत. ते बेताल वक्तव्य करून महायुतीत वातावरण बिघडवण्याचा विडा तुम्ही उचलला आहे का सवाल ही त्यांनी या निमित्ताने केला आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्या तानाजी सावंत यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची हाकालपट्टी करावी अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे. नाही तर आम्ही मंत्रिमंडलातून बाहेर पडतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यानंतर तुम्हाला ओकाऱ्या येत असतील तर कशाला बैठकीत बसता. राजीनामा द्या आणि मोकळे व्हा असेही पाटील यांनी सुनावले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?
संजय शिरसाट सावंतांच्या मदतीला धावले
यावादावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनही प्रतिक्रीया दिली आहे. तानाजी सावंत यांची जी भावना आहे, तशी भावना काही अंशी इतर नेत्यांमध्ये आहे. हे सत्या नाकारता येणार नाही. असं म्हणत तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचे शिरसाट यांनी समर्थनच केले आहे. पण हा गॅप भरून काढण्याचे काम तीनही नेते करत आहे असेही शिरसाट सांगायला विसरले नाहीत. हा गॅप विधानसभा निवडणुकीत भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं राजकारण आहे. त्याला एकदम टाळता येत नाही असेही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे
महायुतीत तणावाचे वातावरण?
महायुतीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. दुसऱ्या फळीचे नेते टोकाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी महायुतीच्या मुख्य नेत्यांना मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय गेल्या काही दिवसापासून महायुतीत अजित पवारांना एकटे पाडले जात असल्याचे चित्र समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक गट नाराज असल्याचेही बोलले जात आहे.