संकेत कुलकर्णी
सध्या राज्यात विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या देखील पूर्ण होत आहेत. अशातच सांगोल्यातून इच्छुक असणारे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपल्या मतदारांना भेटण्यासाठी चक्क पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता गाठलं. त्या मागचं कारण ही मजेशीर आहे. सांगोल्याच्या विजयाचा मार्ग हा पश्चिम बंगालमधून जातो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगोला हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार हे पश्चिम बंगाल येथील कोलकात्त्यामध्ये गलाई कामगार म्हणून काम करतात. गलाई कामगार म्हणजे सोन्या चांदीचे दागिने घडवणारे कारागीर होय. सांगोल्यातील अनेक कामगार या कामा निमित्त तिथेच राहातात. काही जण तिथे स्थायिकही झाले आहेत. त्यांची संख्याही मोठी आहे. ही लक्षात घेवून सांगोल्यातील शेकडो कामगारांना भेटण्यासाठी दीपक साळुंखे पाटील यांनी कलकत्ता वारी केली.
ट्रेंडिंग बातमी - आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले
मूळचे सांगोला तालुक्यातील असणारे गलाई कामगार आज कोलकात्यात आणि पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र या नागरिकांचा, मतदानाचा हक्क आणि इतर शासकीय हक्क आणि अधिकार सर्व सांगोला तालुक्यातच आहेत. हे सर्व गलाई कामगार कायमच आपल्या मूळ गावी सांगोला येथे मतदानास किंवा इतर कामकाजा निमित्त येत असतात. अशा लोकांशी जवळीक साधत हक्काची मतं मिळवण्यासाठी दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आता नामी शक्कल लढवत पश्चिम बंगाल गाठलं.
कलकत्ता येथे दीपक साळुंखे पाटील यांनी गलाई कामगारांचा स्नेह मेळावा घेतला. काही क्षण या कामगारांसोबत व्यतीत केले. आणि या कामगारांच्या मनात घर करून गाठीभेटी घेतल्या. 2019 साली तूटपुंज्या मताधिक्याने सांगोला विधानसभेची निवडणूक आमदार शहाजी पाटील यांनी जिंकली होती. त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात एक एक मत महत्त्वाचं मानलं जातं. म्हणूनच विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वीच कलकत्त्यात असणारी आपली हक्काची मतं मिळवण्यासाठी दीपक साळुंखे यांची कलकत्ता वारी सध्या चर्चेचा विषय बनली.
ट्रेंडिंग बातमी - नागपूर हिट अँड रन आरोपी रितिका मालूला अखेर मध्यरात्री बेड्या, नेमके प्रकरण काय?
सांगोला विधानसभा मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा बालेकिल्ला. त्यांच्या निधनानंतर गणपतराव देशमुखांचे वारसदार डॉ अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेच्या शहाजाबापू पाटील यांनी अवघ्या 700 मतांनी विजय मिळवला. गणपतरावांच्या बालेकिल्ल्याला इतकऱ्या वर्षात सुरूंग लागला. या निवडणुकीतही दीपक सोळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी ऐन वेळी निवडणुकीतून माघार घेतली होती. आता ते स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.