- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता
- विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली
- लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या आंदोलनामुळे तब्बल पाच वेळा स्थगित करावे लागले
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. ससंदेत विरोधी पक्षांनी तर संसदे बाहेर कॉक्रोज पार्टी आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थकांनी सरकारला धाम फोडल्याचं चित्र दिसत होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, 20 जुलैपासून वादळी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. NEET पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. त्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. या गदारोळामुळे लोकसभा आज 5 वेळा स्थगित करावी लागली. तर राज्यसभा पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आली.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हा प्रश्न लावून धरला होता. अध्यक्षांनी विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण त्याचा काही एक फरक विरोधकांवर पडला नाही. अध्यक्षांच्या आवाहनानंतरही गदारोळ न थांबल्याने कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. असे एकदा नाही तर तब्बल पाच वेळ लोकसभा तहकूब करावी लागली. शेवटी अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे प्रश्नकाळ आणि शून्यकाळचे कामकाज होऊ शकले नाही.
नक्की वाचा - Pune News: 'आप'च्या आंदोलनात हुल्लडबाजी! NDTV मराठीच्या प्रतिनिधीची गाडी फोडली
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले. "घोषणाबाजीने संसदेची मर्यादा राखली जात नाही, तर्कशुद्ध चर्चा करा," असे बिर्ला म्हणाले. मात्र, गदारोळ न थांबल्याने त्यांनी पहिल्यांदा बैठक दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केली. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यानंतर ही विरोधकांचा आक्रमक पण कमी झाला नव्हता. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विरोधकांनी 'न्याय दो' आणि 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा घोषणा दिल्या. विरोधक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. ते आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सरकार समोर ही पेच निर्माण झाला होता.
पीठासीन सभापती दिलीप सैकिया यांनी विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. विरोधक एकीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचा प्रश्न मांडत होते. शिवाय शिक्षण मंत्र्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्याच वेळी पीठासीन सभापती मात्र देशातील पूरस्थितीवर चर्चा करण्याचे आवाहन करत होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. यानंतर दुपारी 12.30, 1.00 आणि 2.00 वाजता अशा सलग 5 वेळा लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर संसदे बाहेर ही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधक सभागृहात तर कॉक्रोज पार्टी आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे सरकार बॅकफुटवर आले आहे की काय असे वाटत होते. त्याच वेळी धर्मेंद्र प्रधान यांना ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला बोलवून घेतले होते.