महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. त्यानंतर महायुतीत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा अनेक वेळा बाहेर आल्या. त्यावर महायुतीच्या नेत्यांनीही सारवा-सारव केली. कधी एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी येते, तर कधी अजित पवार रुसतात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद तर अजूनही सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे सुत अजून जुळलेलं दिसत नाही. त्यात आता भाजपच्या आमदाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं आमंत्रणचं अजित पवारांना न देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पुण्यात होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. असं या कार्यक्रमाचे आयोजक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. त्यावर अजित पवारांना या कार्यक्रमाला बोलावलं आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना बोलावणार नाही अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं.
हा कार्यक्रम समाजाचा आहे. हा सरकारी कार्यक्रम नाही. सरकारकडून निधी घेवून हा कार्यक्रम केलेला नाही. त्यामुळे समाज ज्याला बोलवायला सांगेल त्यालाच बोलवले जाईल असं ही पडळकर यांनी यावेळी सांगितले. इथं आपल्याला राजकारण करायचं नाही असं ही ते म्हणाले. मात्र अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. अशा वेळी त्यांना कार्यक्रमाला न बोलावण्याचं कारण काय असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. पण आपण चिल्लर विषयावर बोलणार नाही असं बोलत त्यांनी हा प्रश्न ही टोलावून लावला. यातून अजित पवारांना आपण अधिक महत्व देत नाही असचं एक प्रकारे त्यांनी सुचित केलं.
पवार कुटुंबावर गोपीचंद पडळकर यांनी या आधी ही टोकाची टिका केली आहे. त्यावरून राज्यात वाद ही निर्माण झाला होता. त्यांची तक्रार भाजपच्या वरिष्ठांकडे ही करण्यात आल्या. पण त्यानंतरही पडळकर यांच्यात कुठलाही फरक पडला नाही. त्यांनी पवारां बाबतची भूमीका तिच राहीली आहे. सध्या अजित पवार हे महायुतीत असतानाही पडळकरांनी आपली भूमीका कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमीकेला राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहालं लागणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात 50 हजार धनगरी ढोल वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड केलं जाणार आहे.