महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ऐतिहासिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक ही ठिकाणं पाहण्याची मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची यादी दादर भागातील छत्रपती शिवाजी महाराज पार्कशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
दसरा मेळाव्याची परंपरा
मराठी माणसांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. विजयादशमीच्या दिवशी या मैदानावर 'दसरा मेळावा' घेण्याची परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली. दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटण्यासाठी दरवर्षी शिवसैनिकांची गर्दी होत असे. शिवसेनेच्या पुढील कार्यक्रमांची, भूमिकांची दिशा याच मेळाव्यात बाळासाहेब स्पष्ट करत असत. शिवसेनेच्या नेतृत्त्वात झालेले बदलही या मैदानातूनच जगासमोर आले.आदित्य ठाकरे यांना याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी युवासेनेची जबाबदारी सोपावली. या घटनेनंतर ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली.
शिवेसेतील फुटीनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालंय. या फुटीनंतर शिवाजी पार्कमध्ये कोणत्या गटाचा दसरा मेळावा कोण घेणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मुंबई महापालिकेनं उद्धव ठाकरे यांच्या गटाला इथं दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.
सत्ताबदलांचा साक्षीदार
शिवसेनेसाठी या मैदानाचं महत्त्व हे फक्त दसरा मेळाव्यापुरतं मर्यादीत नाही. राज्यात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचं सरकार सत्तेत आलं. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मनोहर जोशी यांनी शिवाजी पार्कमध्येच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 24 वर्षांनी उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी याच मैदानाची निवड केली होती. शिवसेना -भाजपा युती आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या सरकारचा शपथविधी याच ठिकाणी झालाय. राज्यातील राजकारणात मोठा बदल घडवणाऱ्या या दोन्ही घटनांचं हे मैदान साक्षीदार आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्या शेवटच्या क्षणाचा सोबती
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्कात ठेवण्यात आलं होतं. ज्या मैदानातून शिवसेनेचा आवाज घुमला त्याच मैदानात बाळासाहेंबावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या जागेवर आता एक स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. दरवर्षी बाळासाहेबांची जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी हजारो शिवसैनिक त्यांना अभिवादन देण्यासाठी इथं येतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरही इथंच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनसेशीही नातं
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. मनसेची स्थापना सभाही याच मैदानात झाली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या प्रमाणे मराठी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वर्षप्रतिपदेला मनसेचा शिवाजी पार्कात मेळावा असतो. या मेळाव्यातून राज ठाकरे त्यांच्या आगामी कार्यक्रमाची दिशा स्पष्ट करतात. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी होणारा हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा इव्हेंट आहे.
आंबेडकरी अनुयायींसाठी आसरा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने देशभरातील लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. या अनुयायींसाठी शिवाजी महाराज पार्कवर दोन दिवसांसाठी विशेष सोया केली जाते. त्यांचा राहण्याची आणि जेवणाची इथं सोय केली जाते. या सर्व अनुयायांना मुंबईत आसरा देण्याचं काम हे मैदान करतं.
क्रिकेटपटूंची पंढरी
शिवाजी पार्क मैदानाने जसं राजकारण पाहिलं तसंच अनेक कलाकारांना घडवलं देखील. मुंबई क्रिकेटमधील प्रत्येक लहान-मोठा खेळाडू या मैदानात घडलाय. आजही इथं वर्षभर वेगवेगळ्या वयोगाटातील खेळाडू सराव करत असतात. त्यांचे सामने इथं चालू असतात. मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी असं म्हंटलं जातं. मुंबईला ही ओळख मिळवून देण्यात शिवाजी पार्कचा मोठा वाटा आहे.