राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
समाजसुधारक आणि लोकराजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचं आजही स्मरण केलं जातं. शाहू महाराजांनीच 26 जुलै 1902 रोजी मागास जातींना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक आदेश दिला. त्या निर्णयाची कोल्हापूर संस्थानात अंमलबजावणी केली. या ऐतिहासिक कार्याबद्दल शाहू महाराजांचं नाव नेहमीच मोठ्या आदरानं घेतलं जातं.
नवी दिल्लीतील महाराष्ट्राची ओळख असलेल्या महाराष्ट्र सदनामध्ये शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. देशाच्या राजधानीत राजर्षींचा पुतळा उभारणे ही खरं तर सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. पण, हाच पुतळा बदलण्याची मागणी आता केली जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुतळा बदलण्याची मागणी का?
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार झाला नसल्यानं तो पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सदनामध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आहे. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. आतील मोक्याच्या दर्शनी भागात छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक जण नुकतेच या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या पुतळ्याबाबत नाराजीच्या प्रतिक्रिया वाढल्या आहेत.
( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )
काय आहेत पुतळ्यावरील आक्षेप?
1) शाहू महाराजांचे व्यक्तित्व हे बलदंड आणि पैलवानी शरीरयष्टीचे होते. ते या पुतळ्ळ्यात कुठेही दिसत नाही.
2) पुतळ्यातील शाहू महाराजांची तब्येत कृश आहे.
3) खांदे पडलेले असून, आजारपणातून उठल्यासारखा हा पुतळा आहे. डोळे खूपच आत गेलेले आहेत.
4) दसरा चौकातील पुतळा पाहिलेले जेव्हा महाराष्ट्र सदनातील पुतळा पाहतात, तेव्हा 'आमचे शाहू महाराज असे नव्हते', हीच त्यांची प्रतिक्रिया असते.
सरकारनं दिलं आश्वासन
दरम्यान, शाहू महाराजांच्या या पुतळ्यावरील आक्षेपाचा मुद्दा विधीमंडळ अधिवेशनातही उपस्थित झाला. त्यावर याबाबत चौकशी करुन नागरिकांच्या मतानुसार पुतळा होईल असं आश्वासन उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.