डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना सर्वच स्तरातून आता जोरदार विरोध होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर सोलापूरकरांना झोडून काढण्याचा इशारा दिला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी सोलापूरकरांना चप्पलेने मारणाऱ्याला एक लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांना थेट धमकी दिली आहे. मनूवाद्यांच्या मनातून चातुवर्णाचे भूत कधीही जाणार नाही. जे शिकले. जे ज्ञानी आहेत ते सर्व ब्राम्हण ही त्यांची धारणा आहे. त्यातूनच राहुल सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राम्हण केले आहे. त्यामुळेच या राहुल सोलापूरकरच्या कानाखाली जाळ काढला पाहीजे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नको ते बोलायची गरज काय? असा प्रश्नही त्यानी उपस्थित केला आहे.
सोलापूरकर डॉ. बाबासाहेबांना आरे तुरे कसा बोलू शकतो. अशी विचारणाही आव्हाड यांनी केली. त्यामुळे या सोलापूरकरला कुणी नाही मारलं तरी चालेल, मी तुला झोडणार तुला मारणार अशी थेट धमकीच जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अरे तुरे तुझी लायकी काय आहे. एका पिक्चरमध्ये काम केलं म्हणजे स्वत:ला अमिताभ बच्चन समजायला लागला का? काही बोलून तु लोकांची माथी भडकावणार का? असं ही आव्हाड म्हणाले. त्यामुळे याला जन्माची अद्दल घडवली पाहीजे असंही त्यांनी सांगितले.
आव्हाडां प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी ही सोलापूरकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुत्र्याच्या गळ्यात जसा पट्टा बांधला जातो तसा जातीयवादी राहुल सोलापूरकरच्या गळ्यात भाजपचा पट्टा बांधला गेला आहे. त्यामुळेच त्याला इतकी मस्ती आली आहे असं शरद कोळी म्हणाले. येवढी मस्ती कुणाच्या जीवावर करतोय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अपशब्द बोलणाऱ्या या सोलापूरकरला तुडवा. त्याच्या तोंडात चप्पल मारा. चप्पलने राहुल सोलापूरकरचे तोंड जो कुणी फोडेल त्याला माझ्याकडून एक लाखाचं बक्षिस जाहीर करतो असंही शरद कोळी म्हणाले. त्यामुळे राज्यातलं वातावरण तापण्याचे शक्यता आहे.