राज्यात महायुतीचे सरकार आहे. असं असलं तरी अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मने अजूनही जुळलेली दिसत नाहीत. याचं उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळालं. इथं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजिबात जमत नाही. तटकरेंना टार्गेट करण्याची संधी शिवसेना शिंदे गट सोडत नाही. एकीकडे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीचे पटत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात भाजपने आता शिवसेनेलाच जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर त्यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. प्रकाश देसाई यांनी पाली येथील भाजपच्या मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहे. शिवाय हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी भाजप खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती, असा थेट आरोप यावेळी देसाई यांनी केला. त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं. दरम्यान देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं. रायगडमध्ये काही तालुक्यांमध्ये भाजपची ताकद आहे. पण देसाईंच्या पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये नेहमीच धुसफूस पाहायला मिळाली आहे. आधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होता. त्यात आता भाजपने शिवसेनेच्याच नेत्याला पक्षात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्तेही नाराज झाले आहे. त्यामुळे याची परतफेड कशी करायची याची रणनिती आता आखली जात आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार आहे. शिवाय भरत गोगावले हे मंत्री देखील आहेत.