Aditi Tatkare: बालसुधारगृहातील मुलींचे पलायन, कारण समोर येणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका बालसुधारगृहातील नऊ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केल्याची घटना 30 जून 2025 रोजी घडली होती. या प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल सात दिवसात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्यच्या मुद्द्यावर निवेदन करताना मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती व इतर अधिकाऱ्यांनी 1 जुलै रोजी संस्थेला भेट देत चौकशी केली. तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्यानंतर बालगृहातील नऊ मुलींनी पलायनाचा प्रयत्न केला. असं त्यांनी या औचित्यावर बोलताना विधान परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर सात मुलींना पोलीस व दामिनी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले. 

ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?

मात्र दोन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी सापडली असून एक मुलगी अद्यापही फरार आहे. पाच मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. संस्थेतील अधीक्षक बदलण्यात आला आहे. बालगृह व्यवस्थापन व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले .