संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपासाला वेग येताना दिसतोय. शिवाय या प्रकरणी आणखी काही गोष्टीही समोर यायला सुरूवात झाली आहे. त्यात वाल्मिक कराड इतके दिवस कुठे होता? तो कुठे कुठे गेला होता? त्याच्या संपर्कात कोण होतं? याबाबत बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धक्कादायक खुलासे केले आहे. त्यातील एक खुलासा तर सर्वांची झोप उडवणारा आहे. सोनावणे यांनी केलेल्या या आरोपानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची दाट शक्यता आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्येचे पडसाद विधीमंडळात उमटले होते. त्यानंतर देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगला देले होते. त्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी होती असा खळबळजनक आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. त्याच गाडीतून वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केले होते असा दावाही त्यांनी केला आहे. यागाडीचा मालक कोण आहे? ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात कशी आली? जो कोणी या गाडीचा मालक असेल तर मग त्यालाही सहआरोपी करा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या आधी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी वाल्मिक कराड कुठे कुठे गेला आणि कोणाला भेटला याची माहितीच सोनावणे यांनी समोर आणली आहे. ज्या दिवशी खूनाचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी वाल्मिक कराड हा उज्जैन वरून परळीत आला होता. ज्या वेळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी ही तो परळीतच होता. त्याच दिवशी परळीत पोलिस आणि आरोपीची भेट झाली होती. ही भेट आरोपीच्या नेत्याच्या कार्यालयातच झाली असा धक्कादायक आरोपही सोनवणे यांनी केला आहे.
ते ऐवढ्यावर थांबले नाहीत. या भेटीनंतर आरोपी आपल्या नेत्याचा फार्म हाऊसवर गेला. मंत्रिमंडळाचा ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी वाल्मिक कराड हा नागपूरात होता असं ही सोनावणे यांनी सांगितलं. तिथून तो मध्य प्रदेशातील पंचमडी इथं पळाला. पंचमढी वरून तो पुण्यात आला होता. पुण्यानंतर गोवा, कर्नाटक आणि परत पुण्यात तो परतला. इतका प्रवास करत असताना पोलिसांना त्याचा काहीच कसा पत्ता लागला नाही असा सवाल सोनवणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. या निमित्ताने या प्रकरणाशी आता थेट अजित पवारांचा संबध जोडला गेला आहे.
दरम्यान खासदार बजरंग सोनावणे यांचे हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. अजित पवारांनी मस्साजोगला भेट देवून आता 15 दिवस झाले आहेत. त्यानंतर आता बेछूट आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने बजरंग सोनावणे यांनी आरोप केले आहेत, ते करण्या आधी त्यांनी पुरावे देणे ही गरजेचे होते. पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत अस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितलं.