मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपुर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश ही दिले आहेत. त्यानंतर शरद पवारांनी मस्साजोग इथं जावून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यांच्या पाठोपाठ अजित पवारही मस्साजोग इथं पोहोचले. त्यांनीही देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण सर्वांचे लक्ष होते हे धनंजय मुंडे यांच्याकडे. मुंडे हे बीड जिल्ह्याचे आहेत. शिवाय ते मंत्रीही आहेत. अशा वेळी त्यांची अनुपस्थितीत सर्वांच्या नजरेत आली. त्यामुळे जरी अजित पवारांनी भेट दिली असली तरी चर्चा मात्र धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीची होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चर्चा सर्व राज्यात सुरू आहे. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीची घोषणाही केली. शिवाय आयजी लेव्हलची चौकशी करणार असल्याचे सांगितले. हे सर्व होत असताना शरद पवारांनी मस्साजोग गाठले. तिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. काका जात नाही तोच पुतण्या म्हणजेच अजित पवारांनीही मस्साजोग गाठलं. त्यांनी देशमुख कुटुंबाबरोबर चर्चा ही केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले जी घटना झाली ती अतिशय वेदनादायी आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाबरोबर सरकार आहे असं ते यावेळी म्हणाले.
या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सरकार काही झाले तरी सोडणार नाही. कोणाचा ही या चौकशी दरम्यान दबाव येणार नाही. या हत्ये मागे जो कोणी मास्टर माईंड असेल त्या सोडलं जाणार नाही. अजित पवार हे सांगत असताना देशमुख कुटुंब बोलत होतं, की आम्ही घाबरून गेलो आहोत. त्यावर अजित पवारांनी तुम्ही घाबरू नका. सरकार तुमच्या मागे खंबिरपणे उभे आहे. तुम्हाला पोलिस बंदोबस्त हवा असेल तर तो दिला जाईल असं ही त्यांनी सांगितलं.या प्रकरणातल्या कोणत्याही दोषीला सोडणार नाही. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय देशमुख यांच्या मुलीच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करू असंही ते म्हणाले.
आधी शरद पवार आले होते. त्यानंतर अजित पवार आले. पण मस्साजोगमध्ये खरी चर्चा रंगली होती ती मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थित असल्याची. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंदे समर्थक समजले जातात. शिवाय ते मंत्री ही आहेत. शिवाय बीड जिल्ह्याचे नेते आहेत. अशा वेळी ते देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी का आले नाहीत अशी चर्चा सुरू होती. या प्रकरणात ज्या वाल्मिक कराड याचे नाव येत आहे. हाच वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जातो. त्यामुळेच मुंडे आले नाहीत का असाही चर्चा या परिसरात होती. की मस्साजोगमध्ये न येण्याचे आणखी काही दुसरे कारण आहे याबाबतही लोक आता बोलत आहेत.