मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधकांनी तर ही मागणी लावूनच धरली आहे. पण सत्ताधारी पक्षातील भाजपच्या काही नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचाही त्यात समावेश आहे. त्यात आपण राजीनामा का द्यावा असं धनंजय मुंडे म्हणाले होते. अजित पवारही याबाबत जास्त बोलण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी मागणी केली गेली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप झाले. वाल्मिक कराड हे फरारही होते. त्यांना मुंडेंचाच वरदहस्त होता असा विरोधकांनी आरोप केला. त्यानंतर वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर तर मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाची चौकशी निपक्षपाती पणे होणार नाही. असं ही विरोधक म्हणत होते. त्यांची ही मागणी आजही कायम आहे.
याबाबत जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कडक पावलं उचलली आहेत. सीआयडी चौकशी बरोबर एसआयटीही नियुक्त केली आहे. त्या तपासालाही वेग आला आहे. सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला पाहीजे त्या केल्या जात आहेत.
मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे काय असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमीका मांडली. एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय केला जाईल असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर अजूनही राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचे संकेतच विखे पाटील यांनी या निमित्ताने दिले अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.