Bhaiyyaji Joshi on Marathi Language : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. भैय्याजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार तसंच काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या विषयावर पत्रक काढत नाराजी व्यक्त केली होती.
आपल्या वक्तव्यावर राजकीय वाद पेटल्यानं अखेर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत कोणतंही दुमत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो... सर्वांना याच दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती करतो, असं भैय्याजी यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले भैय्याजी?
'माझ्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे. मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत कोणतेही दुमत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकच मुंबईची भाषा मराठी आहे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. मुंबईतही विविध भाषा बोलणारे लोक राहतात.त्यामुळे त्यांनीही इथे यावे आणि मराठी शिकावे, मराठी समजून घ्यावे, मराठी वाचावे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे.
मला वाटते की भारतात इतक्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात हे सहअस्तित्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. मुंबई हे त्याचे आदर्श उदाहरण आहे असे मला वाटते. पण मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजावे, मराठी बोलावे, मराठी शिकावे, मराठी वाचावे, अशी स्वाभाविक अपेक्षा असते. मला यापेक्षा अधिक काही सांगायचे नाही... माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो... सर्वांना याच दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती करतो,' असं स्पष्टीकरण भैय्याजी यांनी दिलं.
( नक्की वाचा : Raj Thackeray: 'काड्या घालून नवा संघर्ष...', राज ठाकरेंनी घेतला भैय्याजी जोशींचा समाचार; भाजपलाही सवाल )
मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर विधिमंडळात स्पष्टीकरण दिलं आहे. 'मराठी ही मुंबई, महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा असून, येथे राहणाऱ्या लोकांनी ती स्वीकारली पाहिजे. मराठी भाषा ही राज्याच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा एक भाग आहे आणि ती शिकणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर आणि जतन केला जाईल आणि ती आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.