पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये आप, भाजप आणि काँग्रेस अशी प्रामुख्याने तिरंगी लढत होताना दिसणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने देखील ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुकीसाठी या पक्षाचे दिल्ली अध्यक्ष शोएब जमाई यांनी दिल्लीतील दंगलीचा आरोपी शाहरूख पठाण याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. शाहरूख पठाण याला एमआयएम निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाहरूख पठाणचा मुक्काम सध्या तुरुंगात
दिल्लीतील दंगलीचा आरोपी असलेला शाहरूख पठाण हा सध्या तुरुंगात आहे. जर त्याला एमआयएम पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर तो तुरुंगात राहूनच ही निवडणूक लढवेल असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शाहरूख जामिनावर बाहेर आला होता. याच शाहरूख खान याने दंगलीदरम्यान पोलिसावर बंदूक रोखून त्याला धमकावले होते.
शाहरूखच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर जमाई यांनी X वर पोस्ट करत या भेटीबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ही पोस्ट करताना म्हटले आहे की, तुरुंगात कैद असलेल्या शाहरूख पठाणच्या घरी त्याच्या आईशी भेट झाली. शाहरूखचे हालहवाल जाणून घेण्यासाठी आणि त्याला जमेल ती कायदेशीर मदत करण्यासंदर्भात बाचतीच करण्यासाठी शाहरूखच्या आईची भेट घेण्यात आली. दिल्लीला न्याय मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे खटल्याविना तुरुंगात कैद करण्यात आलेल्या अनेक तरुणांच्या कुटुंबाना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
नक्की वाचा : त्यानं 11 जणांना लिफ्ट दिली, सर्वांची हत्या केली आणि मृताच्या पाठीवर लिहिलं 'धोकेबाज'
जमाई यांनी म्हटले आहे की जे खटले प्रलंबित आहेत अशा खटल्यातील आरोपींना जामीन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शाहरूखच्या आईने आरोप केला आहे की अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावरून त्यांच्या मुलावर हा खटला दाखल करण्यात आला आहे. आपण हे कधीही विसरणार नाही असा इशाराही शाहरूखच्या आईने दिला आहे.