अमोल गावंडे, प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा वादग्रस्त वक्तव्यानं गाजला. गांधी यांनी या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यापाठोपाठ त्यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. भाजपासह सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष या मुद्यावर राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यातच या मुद्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी आरक्षण संपवायचं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची जो जीभ छाटून आणून देईल, त्याला 11 लाख रुपये देण्याची घोषणा गायकवाड यांनी केलीय. बुलडाणामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गायकवाड बोलत होते. गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले गायकवाड?
'महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असताना, मागसलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीनं उभं करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागसवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि इतर सर्व प्रवर्गांना आरक्षण दिलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे, असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटामधील मळमळ त्या ठिकाणी ओतून दाखवली.
लोकसभेच्या निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांना मागसवर्गीय, ओबीसी आदिवासी या सर्वांचं आरक्षण 100 टक्के संपवायचं आहे.राहुल गांधी हे जे शब्द बोलला की आरक्षण संपवायचं आहे. माझं आवाहन आहे की जे कुणी राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस मी त्याला या ठिकाणी देईन,' अशी घोषणा गायकवाड यांनी केली.
( नक्की वाचा : भारताविरोध ते सख्ख्या भावाशी लग्नाचा आरोप... राहुल गांधी अमेरिकेत भेटले त्या Ilhan Omar कोण आहेत? )
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्यावेळी आरक्षणच्या समाप्तीबाबत वक्तव्य केलं होतं. 'देशात सर्वांना समान संधी मिळेल त्यावेळी काँग्रेस आरक्षण समाप्त करण्याचा विचार करेल, पण भारतामध्ये सध्या तशी परिस्थिती नाही,' असं राहुल गांधी म्हणाले होते.
त्यानंतर अमेरिकेत पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. मी आरक्षण विरोधी आहे, हे दाखवण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असा दावा गांधी यांनी केला होता. आम्ही आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.