मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News :जळगाव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांची थेट पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघातील गुलाबराव वाघ यांची थेट उपनेतेपदी निवड केली असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नवा डाव आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत गुलाबराव वाघ?
जळगाव जिल्ह्याचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे गुलाबराव वाघ हे गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय मानले जात. मात्र पक्षफुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे आव्हान गुलाबराव वाघांनी गुलाबराव पाटलांना दिले होते. त्यामुळे गुलाबराव पाटलात विरुद्ध गुलाबराव वाघ हा सामना रंगण्याची शक्यता होती.
मात्र जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर गुलाबराव पाटलांविरुद्ध तत्कालीन शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकरांना गुलाबराव पाटलांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेवेळी गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना रंगला होता.
( नक्की वाचा : 'ते गुन्हे लपवण्यासाठी येत असतील,' बडगुजर यांना पक्षात घेण्यात भाजपा आमदाराचा विरोध ! सर्व इतिहास सांगितला )
गुलाबराव वाघ यांना उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण, आघाडीधर्म पाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी जाहीरपणे उघड केली नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गुलाबराव देवकर यांनी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये ही नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गुलाबराव वाघांची थेट उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. जळगान जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पक्षाचे बळ वाढविणे आणि सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.