विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर भारतीय जनता पार्टीनं पक्ष विस्ताराचा प्लॅन आखलाय. राज्यात भाजपाकडून सदस्य नोंदणीचं मोठं अभियान राबवलं जात आहे. माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडं पक्षाच्या संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षानं विस्ताराची योजना आखली आहे.
भाजपाच्या या पक्ष विस्ताराचा पहिला धक्का शिवसेना ठाकरे पक्षाला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणतील बडे नेते आणि माजी आमदार राजन साळवी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. साळवी याच महिन्यात ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साळवी का नाराज?
राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते मानले जातात. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आजपर्यंत साळवी यांनी ठाकरेंना भक्कम साथ दिली आहे. ते 2009 पासून तीन वेळा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सामंत यांनी साळवी यांचा पराभव केला. या निवडणुकीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी मदत केली नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे. त्यांचे राऊत यांच्याशी वितृष्ट निर्माण झाले असून त्यामधूनच ते भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपाकडून त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Walmik Karad ची शरणागती, धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का? CM फडणवीस यांनी दिलं उत्तर )
शिंदेंना चेकमेट
राजन साळवी आणि किरण सामंत हे एकाच मतदारसंघातील थेट प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाण्याऐवजी भाजपाकडं जाण्याचा मार्ग साळवी स्विकारण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जुने नेते असलेल्या साळवींना पक्षात घेऊन या जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या विस्ताराला शह देण्याचा भाजपाचा प्लॅन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.