Shivsena MP Shrikant Shinde Speech : लोकसभेतमध्ये राज्यघटनेवर सुरु असलेल्या चर्चेमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण चांगलंच गाजलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सतत टीका करत असतात. ही टीका काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांना मान्य आहे का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. शिंदे इथंच थांबले नाहीत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य वाचून दाखवत राहुल गांधी यांना प्रश्न विचारला, त्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शिंदे?
श्रीकांत शिंदे या भाषणात म्हणाले की, 'स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीका उबाठाला मान्य आहे का? राहुलजी मी तुम्हाला इंदिरा गांधी यांचं वाक्य ऐकवणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय समितीचे सचिव पंडित बाखले यांच्या पत्राला उत्तर देताना इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की,' मला तुमचे 8 मे 1990 या तारखेचे पत्र मिळाले. ब्रिटीशांच्या सत्तेविरोधात वीर सावरकरांनी दाखवलेल्या धैर्याला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात खास स्थान आहे. भारतमातेच्या महान सपुत्राच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना मी शुभेच्छा देते.'
राहुलजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या आजी देखील संविधानविरोधी होत्या का? तुम्हाला रोज सावरकरांवर उलट-सुलट बोलण्याची सवय आहे. आम्ही सर्वजण सावरकरांची पूजा करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे.
( नक्की वाचा : संसदेतील पहिल्या भाषणात प्रियांका गांधींनी वापरला M3 फॉर्म्युला ! काय आहे काँग्रेसचा नवा प्लान? )
याच संविधानामुळे सामान्य घरातील नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवलं. याच संविधानानं सामान्य घरातील ऑटोरीक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं. श्रीकांत शिंदे यांनी आपलं नाव घेतल्यानं राहुल गांधी यांनी उभं राहून उत्तर देण्याची मागणी केली. पीठासीन अधिकारी कृष्ण प्रसाद तेन्नटी यांनी तात्काळ बोलण्याती परवानगी नाकारली. शिंदे यांचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल असं तेन्नटी यांनी सांगितलं. पण, त्या उत्तरानं समाधान न झालेल्या काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ सुरु केला.
श्रीकांत शिंदे यांनी या गोंधळातच भाषण सुरु ठेवलं. याच संविधानानं काँग्रेसला 400 हून 40 वर आणलं. याच संविधानानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव केला. त्यांच्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपदही मिळालं नाही, अशी आठवण शिंदे यांनी करुन दिली.
श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचा व्हिडिओ