महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांपासून अगदी ग्राम पंचायतीपर्यंत सर्वांचाच कारभार हा प्रशासकाच्या माध्यमातून राबवला जात आहे. शिवाय निवडणुकींची तयारी करणाऱ्या अनेकाना केवळ प्रतिक्षाच करावी लागत आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका घेण्यासाठी सरकारने ही तयारी दर्शवली आहे. त्यात आता राज्य निवडणूक आयोगानेही महत्वाची बैठक बोलवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक (Election) पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे.
ही बैठक अतिशय महत्वाची समजली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय आहे. येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकी बाबत निवडणूक आयोगाला काही तरी ठोस करता येणार आहे. या निवडणुकींकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका कधी जाहीर होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्वच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे.