Kolhapur news: शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक

आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे. पण कोणतेही अधिकृत पेपर सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे. खरे तर या विरोधात 12 पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी 24 जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन 10 जिल्ह्यांमध्ये केले. असं आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं

तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्टेटमेंट दिले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे, ही गोष्ट देखील खरी नाही, आंदोलनकर्ते म्हणत आहे. शक्तीपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप ही केला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Cidco lottery 2025: "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत कशी आणि कुठे पाहाल?

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे. यासाठी राजर्षि शाहू महाराजांच्या भूमीमध्ये 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या व्यापक बैठकीस कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे.

Advertisement