संतोष देशमुख हत्या प्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरले. ऐवढचं नाही तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मीक कराड गजाआड झाला. अन्य आरोपी पकडले गेले. एसआयटी नेमली गेली.सीआयडीकडे ही तपास दिला गेला. पण आता याच सुरशे धस यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. हा धोका दुसरा तिसरा कुणाकडून नाही तर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काय आहे हा सर्व प्रकार त्यावर एक नजर टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस. मुक्काम पोस्ट, आष्टी, जिल्हा बीड. तर लॉरेन्स बिष्णोई मुक्काम पोस्ट, साबरमती जेल. हे दोघे एकमेकांपासून किमान 750 किलोमीटर दूर आहेत. तरीही भाजप आमदार सुरेश धस यांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा धसका घेतला आहे. पण सुरेश धस यांना ही भीती का वाटतेय? तर त्यामागचं कारण आहे. खोक्या. होय तोच खोक्या, जो हरणांची शिकार करत होता. खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. पण प्रश्न असा की लॉरेन्स बिष्णोईलाच सुपारी का? तर त्याचं उत्तर आहे. हरणाची शिकार... महिन्याभरापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर वनविभागाने धाड टाकली.
त्या धाडीदरम्यान हरणाचे सुकलेले मांस, हरणांची हाडे जप्त करण्यात आली होती. खोक्याने शेकडो हरणांची शिकार करुन त्याच्या अवयवांची तस्करी मेघालयमार्गे चीनमध्ये केल्याचा आरोप झाला आहे. खोक्या हा सुरेश धस यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हरणांच्या शिकारीचे तार सुरेश धस यांच्याशी जोडून, हरणांना देव मानणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईला आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा दावाही धस यांनी केला आहे. ते म्हणातत, मी माळकरी माणूस, आता डॉक्टरने सांगितलं म्हणून खातो, पण हरण खाण्यापर्यंत मजल गेली नाही. असं धस यांनीही स्पष्ट केलं आहे.
लॉरेन्स बिष्णोई हा गँगस्टर आहे. तो बिष्णोई समाजाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो विविध जेलमध्ये बंद आहे. सेलिब्रिटींना धमकावून खंडणी उकळणे त्याचा पेशा आहे. जेलमध्ये राहूनच 700 जणांची टोळी तो चालवलो. देशातल्या 10 राज्यांमध्ये बिष्णोई टोळी कार्यरत आहे. लॉरेन्सच्या टोळीमध्ये अनेक शार्पशूटर्स आहेत. बिष्णोई समाज हा हरणांना देवासमान मानतो. त्यामुळे हरणांची शिकारी करणारे त्याच्या हिटलिस्टवर असतात. चिंकारा शिकार प्रकरणी सलमानही त्याच्या रडारवर आहे. आतापर्यंत देशातल्या अनेक बड्या हत्या या गँगनं केल्या आहेत.
आता इतक्या मोठ्या गँगस्टरला सुपारी दिल्याचं सांगताना सुरेश धसांनी परळीकडे बोट केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे धस यांनी परळीचे मुंडे असा जो उल्लेख केला आहे, तो धनंजय मुंडेंच्या दिशेने आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे. धसांच्या जीवाला धोका असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी असं अंजली दमानिया म्हणातात. तर धस यांना धोका असेल तर मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करत तक्रार दाखल करावी असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान या प्रकरणी सुरेश धस लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण दुसरीकडे विरोधक आणि खोक्याचे कुटुंबीय हे मात्र धस यांच्या पाठीशी उभे आहेत. तेजू भोसले या सतीश भोसलेच्या पत्नी आहेत. त्यांनी सुरेश धस यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. तर लोकप्रतिनिधीच्या हत्येचा कट, ही गंभीर गोष्ट आहे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली. त्याच हत्येला सुरेश धस यांनी वाचा फोडली. मग सुरेश धस यांच्या खोक्याचे प्रताप व्हायरल झाले. त्याच्या तस्करीचे तार चीनपर्यंत पोहोचले. आता थेट गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची यात एन्ट्री होणं, कोणत्याही थ्रिलरला लाजवेल, असा हा प्लॉट आहे. उगीच म्हणत नाहीत, गँग्स ऑफ बीड.