एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात राज्याच्या ग्राम विकास मंत्र्यावरच गावकऱ्यांनी हल्ला केला आहे. हा हल्ला त्यांच्यावरच नाही तर स्थानिक आमदारावरही करण्यात आला. आक्रमक गावकऱ्यांना पाहून मंत्री आणि आमदारा महोदयांनी तिथून पळ काढला. जवळपास एक किलोमिटर त्यांना बचावासाठी पळावे लागले. त्यावेळी त्यांच्या मागे गावकरी लागले होते. या हल्ल्यात मंत्र्यांच्या सुरक्षेला असलेला सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जेव्हा बिहार सरकारचे ग्रामविकास मंत्री श्रवण कुमार आणि हिलसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्ण मुरारी उर्फ प्रेम मुखिया यांच्यावर संतप्त गावकऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. त्याला तातडीने हिलसा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच पाटणा येथील शाहजहानपूर पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रसेता अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. हे सर्व याच गावातील होते.
या अपघातातील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी ग्रामविकास मंत्री आणि आमदार मंगळवारी सकाळी हिलसा ब्लॉकमधील मलवा गावात पोहोचले होते. पण गावात पोहोचताच, आधीच संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी नेत्यांना घेरले. गावकऱ्यांचा आरोप होता की, इतक्या मोठ्या रस्ता अपघाताच्या दुर्घटनेनंतरही आमदारांनी अद्याप पीडित कुटुंबां प्रति संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीही ठोस मदत केली नाही. याच रागातून जमावाने अचानक मंत्री आणि आमदारावर हल्ला केला.
परिस्थिती इतकी बिघडली की, दोन्ही लोकप्रतिनिधींना कसाबसा जीव वाचवून तिथून पळून जावे लागले. गावकऱ्यांचा संताप आणि हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी पोलिसाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. जदयूचे प्रवक्ते धनंजय देव यांनी सांगितले की, स्थानिक लोक आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. हा हल्ला आमदारांवर झाला आहे. सध्या, मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तळ ठोकला आहे.