Who is Ira jadhav: मुंबईची कन्या, अवघ्या 14 वर्षाची क्रिकेटपटू इरा जाधवने देशांतर्गत स्पर्धेत इतिहास घडवला आहे. इरा जाधवने 19 वर्षाखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तडाखेबंद खेळी करत त्रिशतक झळकावले. या खेळीसोबतच इरा जाधव 19 वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या खेळीत इराने तब्बल 16 षटकार आणि ४२ चौकारांच्या मदतीने 346 धावा केल्या.
रविवारी, बंगळुरूमध्ये मेघालयविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इरा जाधवने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अजित आगरकर यांच्याच शाळेत शिकलेल्या शारदाश्रम विद्यामंदिरची विद्यार्थिनी इराने 157 चेंडूंमध्ये 42 चौकार आणि 16 षटकारांसह 346 धावांची विक्रमी खेळी खेळली.
इराच्या त्रिशतकाच्या जोरावर आणि कर्णधार हार्ले गालाच्या शतकी खेळीमुळे मुंबईने 3 बाद 563 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल, मेघालय संघ फक्त 19 धावांवर गारद झाला आणि डावात सहा खेळाडू शून्य धावांवर बाद झाले. यासह, मुंबईने 544 धावांचा मोठा विजय नोंदवला. या खेळीसोबतच इरा जाधव 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आत्तापर्यंत कोणत्याही महिला खेळाडूला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आतापर्यंत, फक्त चार भारतीय महिला फलंदाजांनी अंडर-19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 2013 मध्ये 224 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या दिग्गज फलंदाज स्मृती मानधना हिचेही नाव आहे.
कोण आहे इरा जाधव?
14 वर्षीय इरा जाधव ही मुळची मुंबईची असून भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अजित आगरकर यांनी शिक्षण घेतलेल्या शारदाश्रम विद्यामंदीर शाळेत ती शिकते. गेल्यावर्षीच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात इरा जाधव उतरली होती मात्र तिच्यावर बोली लागली नाही. आता मलेशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारताच्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक संघाच्या 'स्टँडबाय'मध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
मलेशियाविरुद्धच्या त्रिशतकी खेळीनंतर इरा जाधववर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालील गटात सर्वाधिक धावांचा विक्रम द. आफ्रिकेच्या लिझेल ली हिच्या नावावर आहे. 2010 मध्ये लिझेलने Mpumalanga संघाकडून खेळताना Kei संघाविरुद्ध नाबाद 427 रन्स केल्या होत्या.
(नक्की वाचा- Accident News : मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायली निघाले, मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं)