गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. खराब फॉर्ममुळे रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला बाहेर ठेवल्यानंतर या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. याबाबत आता स्वतः रोहित शर्माने याबाबत थेट बीसीसीआयसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी बीसीसीआयची बैठक झाली. ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीबाबत ही आढावा बैठक होती. या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या आढावा बैठकीत रोहित शर्माने आपल्या कर्णधारबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. तो आता काही काळच कर्णधार राहील, तोपर्यंत बीसीसीआय पुढील कर्णधार शोधू शकते. असे म्हणत त्यांनी बीसीसीआयच्या पुढील कर्णधाराच्या निवडीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
या आढावा बैठकीत कर्णधार रोहित शर्मासह मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील उपस्थित होते. रोहित शर्माने बोर्डाकडे आणखी काही महिने संघाचा कर्णधार राहू इच्छितो असे म्हणत आता नवीन कर्णधार शोधण्याची विनंती केली आहे. तसेच रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराहला कर्णधार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, परंतु अद्याप यावर एकमत झालेले नाही, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जसप्रीत बुमराहच्याही वारंवार दुखापतीच्या तक्रारी येत आहेत.
दरम्यान, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो कर्णधार राहणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची निवड न होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे रोहितच्या या भूमिकेवर आता बीसीसीआय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.