Chris Gayle Slams Punjab Kings : क्रिकेट विश्वात 'युनिव्हर्स बॉस' (Universe Boss) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने (Chris Gayle) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील त्याच्या पंजाब किंग्समधील (Punjab Kings) कारकिर्दीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. टी-20 क्रिकेटमधील एक महान बॅटर असूनही, पंजाब किंग्जने त्याचा 'अपमान' केल्याचा आरोप गेलनं केला आहे. या अपमानामुळे आपल्याला नैराश्य (depression) आल्याचेही त्याने म्हटले आहे. गेल 2018 ते 2021 या काळात पंजाब किंग्सकडून (पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब) खेळला. या कालावधीमध्ये त्यानं एकूण 41 मॅचमध्ये 1,304 रन्स केले. यामध्ये त्याची सरासरी 40.75 आणि स्ट्राइक रेट 148.65 होता.
या कामगिरीमध्ये एक सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे, तर त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 104 आहे. या कामगिरीनंतरही फ्रँचायझीसोबतच्या गेलनं कटू आठवणी सांगितल्या आहेत.
काय म्हणाला गेल?
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवरील एका चर्चेत गेल म्हणाला, “पंजाबसोबतची माझी आयपीएल कारकीर्द अकाली संपली. किंग्स इलेव्हनमध्ये माझा अपमान झाला. लीगसाठी आणि फ्रँचायझीसाठी मी एवढे योगदान दिले असतानाही, माझ्यासारख्या वरिष्ठ खेळाडूची योग्य वागणूक मिळाली नाही असे मला वाटले. त्यांनी माझ्यासोबत लहान मुलासारखे वर्तन केले. आयुष्यात पहिल्यांदाच मला नैराश्य आल्यासारखे वाटले. मी अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्याशी बोलताना खूप निराश झालो, कारण मला खूप वेदना झाल्या होत्या. त्यांच्या वागणुकीमुळे आणि फ्रँचायझीच्या कारभारावर मी नाराज होतो.”
( नक्की वाचा : Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि स्वरुप )
'केएल राहुलने फोन केला, पण मी...'
गेलने असाही गौप्यस्फोट केला की, जेव्हा पंजाब किंग्सचा (Punjab Kings) तत्कालीन कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) त्याला फोन करून पुढील सामन्यात खेळण्याची खात्री दिली, तेव्हा त्याने फक्त आभार मानले आणि तिथून निघून गेला.
गेलने सांगितले, “केएल राहुलने मला फोन करून सांगितले, 'ख्रिस, थांब, तू पुढील सामन्यात खेळशील.' पण मी त्याला फक्त 'ऑल द बेस्ट' (I wish you all the best) म्हटले, माझी बॅग पॅक केली आणि निघून गेलो.”