IPL 2026, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2026 मधील सलग दुसरा सामना जिंकला आहे. दिल्लीनं शनिवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं दिलेलं 163 रन्सचं आव्हान दिल्लीनं 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
163 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. केएल राहुल आणि नितीश राणा झटपट आऊट झाले होते. त्यानंतर समीर रिझवीनं दिल्लीची इनिंग सावरली. समीरनं 51 बॉलमध्ये 90 रन केले. या खेळीत 7 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. रिझवीची सेंच्युरी हुकली असली तरी त्यानं टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
विशेष म्हणजे यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या मॅचमध्येही समीरनं दिल्लीला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला होता. या सिझनमधील दिल्लीचा हिरो ठरलेल्या समीर रिझवी कोण आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसंच त्याच्या या कामगिरीचं सीएसके कनेक्शन काय? त्याचा खेळ पाहून धोनी आणि सीएसकेला का पश्चातार होत आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )
कोण आहे समीर रिझवी? (Who is Sameer Rizvi)
उत्तर प्रदेशातील मेरठचा राहणारा 22 वर्षांचा समीर रिझवी आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. विशेषतः स्पिन बॉलर्सविरुद्ध तो अतिशय निर्भयपणे मोठे फटके लगावतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.
अंडर 23 स्टेट ए ट्रॉफीमध्ये त्याने अवघ्या 97 बॉलमध्ये 201 रन्स करत सर्वात वेगवान डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. युपी टी20 लीगमध्येही त्याने केवळ 47 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
चेन्नई सुपर किंग्सला का होतोय पश्चात्ताप?
समीर रिझवीच्या या कामगिरीमुळे सध्या सर्वात जास्त चर्चा चेन्नई सुपर किंग्सची (CSK) होत आहे. आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये चेन्नईने समीरला तब्बल 8.4 कोटी रुपये मोजून टीममध्ये घेतलं होतं. त्याने आपल्या आयपीएल करिअरच्या पहिल्याच बॉलवर राशिद खानसारख्या दिग्गज बॉलरला सिक्स मारला होता.
मात्र, त्या सिझनमध्ये 8 इनिंग्समध्ये त्याला केवळ 51 रन्स करता आले होते. खराब कामगिरीमुळे चेन्नईने त्याला रिलीज केलं. चेन्नईने सोडलेल्या याच खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने 2025 च्या ऑक्शनमध्ये केवळ 95 लाख रुपये देऊन त्यांच्या ताफ्यात सामील केलं. आता त्याची ही वादळी कामगिरी पाहून धोनी आणि चेन्नई मॅनेजमेंटला त्याला सोडल्याचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
दिल्लीसाठी ठरतोय हुकमी एक्का
दिल्ली कॅपिटल्सने समीरवर दाखवलेला विश्वास आता सार्थ ठरताना दिसत आहे. 2025 च्या सिझनमध्ये त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 25 बॉलमध्ये 58 रन्सची वेगवान खेळी केली होती, त्यामुळेच दिल्लीने त्याला 2026 च्या सिझनसाठी रिटेन केलं. आता सिझनच्या सुरुवातीलाच त्याने दोन मोठ्या इनिंग्स खेळून दिल्लीचं प्ले-ऑफचं स्वप्न जिवंत ठेवलं आहे. ज्या पद्धतीने समीर सध्या बॅटिंग करत आहे, ते पाहता तो या सिझनमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही दिसू शकतो.