Dharavi News : आशिया खंडातील सर्वात मोठी वस्ती असलेल्या धारावीमध्ये लवकरच एक उत्साहपूर्ण आणि बौद्धिक खेळ महोत्सव पाहायला मिळणार आहे. धारावीतील तरुण बुद्धिबळपटूंना एक मोठे आणि प्रतिष्ठित व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने 'धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप 2025' चे आयोजन करण्यात आले आहे.
Nav Bharat Mega Developers Pvt. Ltd. (एनएमडीपीएल) आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने 12 डिसेंबर 2025 रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत धारावीतील 30 हून अधिक शाळांमधील 200 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होऊन आपली बुद्धिमत्ता सिद्ध करतील.
विद्यार्थ्यांना होणार फायदा
हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, धारावीतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी आणि बौद्धिक कौशल्यांना वाव देण्यासाठी एनएमडीपीएल आणि अदाणी समूहाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
जागतिक स्तरावर समृद्ध आणि बौद्धिक खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि दूरदृष्टी विकसित होते. त्यामुळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला केवळ भौतिक सुविधा सुधारण्यापुरते मर्यादित न ठेवता, नागरिकांचे राहणीमान आणि जीवनशैली बदलण्याच्या व्यापक ध्येयाचा एक भाग म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या प्रगतीकेंद्रित दृष्टीकोनाची जडणघडण होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Gautam Adani Speech :' जे तुम्ही बनाल, तोच आपला भारत बनेल': गौतम अदाणी यांची तरुणांना मोठी साद )
आर. प्रज्ञानानंद होणार सहभागी
या कार्यक्रमाची आणखी एक खास बाब म्हणजे यात भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारा प्रख्यात बुद्धिबळपटू, आर. प्रज्ञानानंद हा सहभागी होणार आहे. प्रज्ञानानंद विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल आणि प्रदर्शनी सामने देखील खेळेल. तो खेळाडूंना शिस्त, एकाग्रता, चिकाटी आणि विचारशक्ती यांसारख्या महत्त्वाच्या जीवनमूल्यांवर मार्गदर्शन करेल. हे गुण केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर रोजच्या जीवनातही विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा उपक्रम तळागाळातील मुलांना विश्लेषणशक्ती, जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती वाढवण्याची संधी देतो.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. एनएमडीपीएल पुढील पिढीसाठी मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उच्च ध्येये गाठण्याची नवी क्षितिजे खुली करत आहे. अदाणी समूहाने नोव्हेंबर २०२२ मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम स्वीकारले होते, तेव्हापासून अशा समाजकेंद्रित उपक्रमांची एक मालिकाच धारावीमध्ये सुरू आहे, आणि 'धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप 2025' हा त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा आहे.