Ruturaj Gaikwad, Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीची दुसरी सेमीा फायनल आजपासून (4 सप्टेंबर 2025) वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात बंगळूरु येथे खेळली जात आहे. यामध्ये वेस्ट झोनकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने सेंच्युरी झळकावत सर्वांना प्रभावित केले आहे. टीम अडचणीत असताना ऋतुराजनं दमदार सेंच्युरी झळकावली. त्यामुळे त्याची ही खेळी विशेष महत्त्वाची आहे. त्यानं 206 बॉलमध्ये 25 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 184 रन्स केले. या महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत ऋतुराजचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यावेळी त्यानं बॅटनं दमदार खेळी करत निवड समितीला आपण सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
गायकवाडचा तडाखा
सेंट्रल झोनविरुद्धची गायकवाडची ही सेंच्युरी त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीतील सेंच्युरी आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण 39 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून 66 इनिंगमध्ये 2732 रन्स आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आठ सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरी आहेत.
ऋतुराजनं पहिली हाफ सेंच्युरी 85 बॉलमध्ये पूर्ण केली. त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याने 131 बॉलमध्ये 100 चा टप्पा पार केला. ऋतुराजच्या 184 रन्सच्या जोरावर वेस्ट झोननं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 6 आऊट 363 रन्स केले आहेत.
( नक्की वाचा : Amit Mishra: 25 वर्षांच्या प्रवासानंतर अमित मिश्राचा निवृत्तीचा निर्णय; नावावर आहे भयंकर दुर्मीळ रेकॉर्ड )
गायकवाडच्या फलंदाजीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सेंट्रल झोनच्या कुशल स्पिनर्सना कुशल पद्धतीनं खेळून काढले. डावखुरा स्पिनर हर्ष दुबे आणि ऑफ-स्पिनर सारंश जैन, यांचा त्याने सहज सामना केला.
ऋतुराज गायकवाडची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
ऋतुराज गायकवाडनं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आजवर सहा वन-डे आणि 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं वन-डे मॅचमध्ये 19.16 च्या सरासरीनं 115 रन्स तर T20I मध्ये 39.56 च्या सरासरीने 633 रन्स काढले आहेत. गायकवाडच्या नावावर टी20 मध्ये एक सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरी आहेत. तर त्यानं वन-डेमध्ये एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.