भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू सुरेश रैना याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन बेटिंग ॲप 1xBET च्या जाहिरातीसाठी त्याला सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या ॲपचे ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने रैनावर ही कारवाई करण्यात आली आहे.
रैना आज, 13 ऑगस्ट रोजी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. रैना यांच्यासोबतच अनेक इतर क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजही या प्रकरणात तपासणीच्या रडारवर आहेत.
मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैनाला 1xBET नावाच्या एका बेकायदेशीर बेटिंग ॲपशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी 13 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. एकदा ते चौकशीसाठी हजर झाले की, फेडरल तपास यंत्रणा त्यांच्या स्टेटमेंटची नोंद मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करणार आहे.
रैना याचा या ॲपशी काही जाहिरातींद्वारे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे अधिकारी चौकशीदरम्यान त्यांच्या या ॲपसोबतच्या संबंधांबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतील.
अनेक सेलिब्रिटीज रडारवर
ईडी सध्या अनेक बेकायदेशीर बेटिंग ॲप्सची चौकशी करत आहे. या ॲप्सने अनेक लोकांना आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आल्याने ईडीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.