FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इराणने बेल्जियमसारख्या बलाढ्य संघाला 0-0 असे बरोबरीत रोखून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र, या सामन्यानंतर इराणचे हेड कोच अमीर घालेनोई यांनी फिफाच्या नियोजनावर आणि प्रवासाच्या अत्यंत वाईट व्यवस्थेवर जोरदार तोफ डागली आहे. आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून युद्धाची परिस्थिती आणि देशांतर्गत लीग बंद असण्याचा सामना करत आहोत, तसेच विश्वचषकासाठी तब्बल 40 तासांचा खडतर प्रवास करावा लागला, असा खळबळजनक खुलासा घालेनोई यांनी केला आहे.
सोफाय स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात इराणचा गोलकीपर अलीरेझा बैरानवंदने भक्कम बचावाचे उदाहरण दाखवत बेल्जियमचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर, इराणने आता ग्रुप G च्या गुणतालिकेत 2 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे बाद फेरीत (राऊंड ऑफ 32) पोहोचण्याचे आव्हान कायम आहे.
काय केले आरोप?
सामन्यानंतर इराणी वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्य प्रशिक्षक अमीर घालेनोई म्हणाले की, आम्ही अत्यंत वाईट परिस्थितीत या विश्वचषकात प्रवेश केला आहे आणि हे संपूर्ण जगाला माहीत हवे आहे. व्हिसाच्या अडचणी, प्रवासातील गोंधळ आणि तयारीसाठी मिळालेला कमी वेळ यामुळे आमचे मोठे नुकसान झाले. आम्ही सामन्याच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा किक-ऑफसाठी 16 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक होता. जगात कोणताही टीम इतक्या कमी वेळात दोन मोठे प्रवास करत नाही.
या कठीण परिस्थितीतही खेळाडूंनी मैदानावर दाखवलेले शौर्य इतिहास नक्कीच लक्षात ठेवेल, असे घालेनोई म्हणाले. सामन्यादरम्यान इराणला गोल करण्याच्या दोन स्पष्ट संधी मिळाल्या होत्या, मात्र बेल्जियमचा गोलकीपर थिबॉत कोर्टुआ याने त्या रोखल्या. दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियमचा खेळाडू नॅथन नगोय याला लाल कार्ड मिळाल्यामुळे बेल्जियमला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. इराणच्या अलीरेझा याने संपूर्ण सामन्यात 7 उत्कृष्ट सेव्ह केले, ज्यामुळे त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
( नक्की वाचा : FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कपचे वेळापत्रक वाचा एका क्लिकवर, नोट करा तुमच्या आवडत्या टीमच्या मॅचची वेळ )
पुढील सामन्यापूर्वी प्रवासाचे मोठे संकट
इराणचा पुढील आणि निर्णायक सामना आता शनिवारी सिएटल येथे इजिप्तविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी मिळणाऱ्या वेळेवर नाराजी व्यक्त करताना घालेनोई म्हणाले की, आम्हाला सामना संपताच लगेच विमानाने पुढच्या प्रवासासाठी निघावे लागत आहे. खेळाडूंना विश्रांतीसाठी अजिबात वेळ दिला जात नाहीये. आता इजिप्तविरुद्ध मैदानात उतरताना आम्हाला एका विशेष रणनीतीसह उतरावे लागेल.
या अत्यंत कठीण मानसिक आणि शारीरिक परिस्थितीतही इराणचे खेळाडू देशासाठी जीवाची बाजी लावून मैदानात उतरत आहेत. सामन्यानंतर खेळाडूंनी स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये चाहत्यांसाठी एक अत्यंत भावनिक हस्तलिखित संदेश लिहून ठेवला. यामध्ये त्यांनी फॅन्सच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. इराणला आता बाद फेरीत जागा मिळवण्यासाठी इजिप्तविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजयाची किंवा सकारात्मक निकालाची गरज आहे.