FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या नॉर्वेच्या टीमने त्यांच्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पण त्याहूनही अधिक चर्चा रंगली आहे ती त्यांच्या एका हटके सेलिब्रेशनची. सध्या सोशल मीडियावर हे सेलिब्रेशन कमालीचे व्हायरल झाले असून याला वायकिंग रो असे नाव देण्यात आले आहे. सेनेगलविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात 3-2 असा विजय मिळवत नॉर्वेने बाद फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर मैदानातच खेळाडूंनी हे भन्नाट सेलिब्रेशन केले. 1998 नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या नॉर्वेच्या चाहत्यांनी स्टेडियमपासून ते थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपर्यंत हे वायकिंग रो सेलिब्रेशन करून धुमाकूळ घातला आहे.
सेनेगलविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एर्लिंग हालांड आणि मार्टिन ओडेगार्ड याने सर्व खेळाडूंना एकत्र केले आणि फॅन्ससोबत मैदानात बसून हे सेलिब्रेशन सुरू केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक स्टॅले सोलबॅकन हे देखील धावत येत खेळाडूंच्या मागे जाऊन बसले. एखाद्या वायकिंग जहाजासारखी रचना करून सर्व खेळाडू मैदानात ओळीत बसले आणि कर्णधार ओडेगार्ड याने ड्रम वाजवत या सेलिब्रेशनला सुरुवात केली.
नक्की काय आहे हे वायकिंग रो सेलिब्रेशन?
हे सेलिब्रेशन नॉर्वेच्या ऐतिहासिक वायकिंग परंपरेशी जोडलेले आहे. इतिहासानुसार, इसवी सन 700 ते 1100 या काळात वायकिंग्सचा काळ मानला जायचा. स्कॅन्डिनेव्हियामधील हे लोक आपल्या लांब जहाजांमधून (लाँगबोट) इतर देशांमध्ये व्यापारासाठी प्रवास करायचे. त्यामुळे या सेलिब्रेशनमध्ये जहाजाचे वल्हे मारण्याची म्हणजेच बोट चालवण्याची (रोइंग) नक्कल केली जाते. ही कृती नॉर्वेच्या अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.
खेळाडू ही या सेलिब्रेशनचे फॅन
नॉर्वेचा मिडफिल्डर पॅट्रिक बर्ग याने सांगितले की, सुरुवातीला हे सेलिब्रेशन इतके प्रसिद्ध होईल असे कोणालाच वाटले नव्हते. पण आता संपूर्ण जगभरात याची क्रेझ पाहायला मिळत आहे. खेळाडूंपेक्षा चाहत्यांनीच याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, असेही बर्ग म्हणाला. तर फॉरवर्ड अलेक्झांडर सोर्लोथ याने अत्यंत आनंदाने सांगितले की, ज आम्ही या सेलिब्रेशनचा आवाज ऐकतो तेव्हा तो खरोखरच जादुई अनुभव असतो. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला, तर या वर्ल्ड कपमध्ये खूप पुढे जाऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
सध्या नॉर्वेचा संघ आपल्या ग्रुपमध्ये 6 पॉईंट्ससह फ्रान्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात हे वायकिंग रो सेलिब्रेशन पुन्हा पाहायला मिळणार का, याकडे फुटबॉल जगताचे लक्ष लागले आहे.