FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 पार पडले असून स्पेनच्या रुपाने फुटबॉल विश्वाला नवा विजेता मिळाला आहे. त्याचवेळी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीचा शेवट मात्र त्याच्यासाठी त्रासदायक ठरला. मेस्सीने जून महिन्यातच वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. 2030 च्या पुढील वर्ल्डकपमध्ये तो 43 वर्षांचा असेल, त्यामुळे या वयात एवढ्या मोठ्या मंचावर खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण मानले जाते. कतारमध्ये 2022 मध्ये मिळवलेल्या विश्वविजेतेपदानंतर सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी मेस्सी तयार दिसत होता, मात्र फायनलमध्ये त्याचे हे स्वप्न भंगले.
मेस्सीची कशी होती कामगिरी?
यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये मेस्सीची कामगिरी अतिशय उत्कृष्ट राहिली. त्याने अर्जेंटिनाला फायनलमध्ये पोहोचवताना 8 गोल केले आणि 4 असिस्ट (गोलसाठी दिलेल्या पास) नोंदवले. त्याच्या संपूर्ण वर्ल्डकप कारकिर्दीतील गोलांची संख्या 21 वर पोहोचली होती. मात्र, फ्रान्सच्या किलियन एमबापेने तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात 2 गोल करून 22 गोलांसह मेस्सीला मागे टाकले.
एमबापेने संपूर्ण स्पर्धेत 10 गोल आणि 4 असिस्ट नोंदवून गोल्डन बूट आपल्या नावावर केला. मेस्सीकडे गोल्डन बूट मिळवण्याची संधी होती, पण फायनलमध्ये स्पेनच्या मजबूत बचावामुळे त्याला पहिल्या हाफमध्ये केवळ 15 आणि संपूर्ण सामन्यात फक्त 54 वेळाच बॉलला स्पर्श करता आला.
( नक्की वाचा : Rohit Sharma: 'मला हेच सांगण्यात आलंय...' निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माने दिलं थेट उत्तर, पाहा VIDEO )
तरीही मेस्सीची गोल्डन बॉल का हुकला?
मेस्सीने 2014 आणि 2022 मध्ये गोल्डन बॉल पुरस्कार जिंकला होता. यंदाही तो या पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात होता. जेव्हा जेव्हा अर्जेंटिनाचा संघ अडचणीत सापडला, तेव्हा मेस्सीने तारणहाराची भूमिका बजावली. इजिप्तविरुद्धच्या राउंड ऑफ 16 सामन्यात अर्जेंटिना 0-2 ने पिछाडीवर असताना मेस्सीने अप्रतिम गोल केले.
तसेच इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिना 84 व्या मिनिटापर्यंत 0-1 ने मागे होता, तेव्हा मेस्सीने अवघ्या 7 मिनिटांत 2 अप्रतिम असिस्ट देऊन एन्झो फर्नांडिस आणि लॉतारा रो मार्तिनेझ यांच्याकडून गोल करून घेतले आणि संघाला विजय मिळवून दिला.
0 गोल आणि 0 असिस्ट असतानाही रॉड्री कसा ठरला सर्वोत्कृष्ट?
अर्जेंटिनाला 1-0 ने पराभूत करून स्पेनने दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्पेनचा कर्णधार रॉड्री. मँचेस्टर सिटीचा हा मिडफील्डर मे 2025 मध्ये गुडघ्याच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल 8 महिन्यांनी मैदानात परतला होता. या स्पर्धेत रॉड्रीने एकही गोल किंवा असिस्ट नोंदवला नाही, तरीही त्याला फिफा वर्ल्डकप 2026 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच 'गोल्डन बॉल' पुरस्कार देण्यात आला.
फिफाच्या आकडेवारीनुसार, रॉड्रीने संपूर्ण स्पर्धेत 94 टक्के अचूकतेसह सर्वात जास्त 753 पास पूर्ण केले. त्याने 1803 प्लेमध्ये सहभाग नोंदवला, जो इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा तब्बल 200 ने जास्त होता. न्यू यॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध अतिरिक्त वेळेत मिळवलेल्या 1-0 च्या विजयात रॉड्रीने 105 पैकी 101 पास अचूक दिले. तसेच 80 टक्के ड्युअल्स जिंकले आणि 2 संधी निर्माण केल्या.
त्याच्या उत्कृष्ट डिफेन्स आणि मिडफिल्ड नियंत्रणामुळेच स्पेनने संपूर्ण 8 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना फक्त 1 गोल करू दिला. याच अफाट कामगिरीमुळे त्याला फिफाचा सर्वात प्रतिष्ठित 'गोल्डन बॉल' पुरस्कार देण्यात आला आहे.