Lionel Messi Once Bathed Baby Lamine Yamal: फिफा वर्ल्ड कप फायनलचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अशी यंदाची फायनल होणार आहे. ही फायनल कोण जिंकणार याबाबत सर्व फॅन्सची उत्सुकता ताणली गेली आहे. त्याचवेळी जगभर एका खास योगाची चर्चा सुरु आहे. हा असा योग आहे ज्याची कल्पना 19 वर्षांपूर्वी कोणी स्वप्नातही केली नसेल.
फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात जेव्हा अर्जेंटिना आणि स्पेनचे संघ आमनेसामने असतील, तेव्हा फुटबॉल चाहत्यांना एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. एका बाजूला फुटबॉलचा महान जादूगार लिओनेल मेस्सी असेल, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याच हाताने 19 वर्षांपूर्वी आंघोळ घातलेला आणि कडेवर खेळवलेला एक मुलगा त्याला थेट टक्कर देणार आहे. हा अद्भूत योगायोग सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
2007 मध्ये झाली सुरुवात
हा सर्व प्रकार 2007 मधील एका खास घटनेशी जोडलेला आहे. त्यावेळी २० वर्षांच्या लिओनेल मेस्सीने एका कॅटलन वृत्तपत्राच्या युनिसेफ चॅरिटी कॅलेंडर फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. या मोहिमेअंतर्गत बार्सिलोना क्लबच्या खेळाडूंना स्थानिक कुटुंबांसोबत फोटोशूट करायचे होते. योगायोगाने मेस्सीच्या वाट्याला लामिन यामल नावाचा एक लहानगा बाळ आला.
Photo Credit: X/@viewsfrance
मेस्सीने त्या फोटोशूट दरम्यान एका बाथटबमध्ये लामिन यामलला मोठ्या प्रेमाने आपल्या हाताने आंघोळ घातली आणि कडेवर घेऊन फोटो काढले. त्यावेळी मेस्सीला किंवा तिथल्या कोणालाही अंदाज नव्हता की हा लहानगा मुलगा पुढे जाऊन फुटबॉल जगतात नवा चमत्कार घडवणार आहे.
( नक्की वाचा : Lionel Messi Wife : कोण आहे लियोनेल मेस्सीची पत्नी? कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण, प्रेमासाठी केला मोठा त्याग )
वडिलांनी फोटो शेअर केला आणि...
या थक्क करणाऱ्या खुलासा 2024 मध्ये झाला, जेव्हा लामिन यामलच्या वडिलांनी हे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो इंटरनेटवर येताच तुफान व्हायरल झाले आणि फुटबॉलचे चाहते अवाक झाले. मेस्सीच्या कडेवर खेळणारा तो छोटा बाळ आता बार्सिलोना क्लबचा आणि स्पेन देशाचा एक नवा वंडरकिड म्हणून फुटबॉल विश्वावर राज्य करण्यास सज्ज झाला होता. लामिन यामलने आपल्या खेळाने सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
Photo Credit: X/@viewsfrance
फुटबॉल जगताचे दोन मोठे सुपरस्टार आमनेसामने
लामीन यामल अजूनही टीनएजर आहे, तरीही त्याने क्लब आणि आपल्या देशासाठी खेळताना एकामागून एक अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. स्पेनच्या नव्या पिढीचा तो एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याची शानदार ड्रिबलिंग आणि वयाच्या मानाने मैदानावर दाखवलेले कमालीचे शहाणपण यामुळे तो फुटबॉलचा पुढचा ग्लोबल सुपरस्टार मानला जात आहे.
दुसऱ्या बाजूला 39 वर्षांच्या लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा वयाला मात दिली आहे. अर्जेंटिनाच्या या कर्णधाराने आपल्या अनुभवाच्या जोरावर या वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने शेवटच्या क्षणी दोन शानदार असिस्ट करत अर्जेंटिनाला अंतिम फेरीत पोहोचवले. आता अंतिम सामन्यात या दोन पिढ्यांमधील आणि या भावनिक नात्यातील चुरशीची लढत पाहण्यासाठी जग उत्सुक आहे.