शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या जिगरबाज कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड खूश झाले आहेत. ओव्हल येथील सामना जिंकत इंग्लंडविरूद्धची मालिका भारतीय संघाने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी मोहम्मद सिराजने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने हा अटीतटीचा सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत राखण्यात मोठा वाटा उचलला. या ऐतिहासिक विजयानंतर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शब्बीर अहमदने भारतीय संघावर गंभीर आरोप केले आहेत. शब्बीर अहमदच्या या खुळचट आरोपानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एक सेकंदही न दवडता X वर त्याची बिनपाण्याने धुलाई करण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा: कसोटी सामना भारताने जिंकला, पण मनं मात्र क्रिस वोक्सच्या एक कृतीने जिंकली, पाहा VIDEO )
शब्बीर अहमदने काय आरोप केला?
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शब्बीर अहमदने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "माझ्या मते, भारतीय संघाने बॉलला शाईन यावी यासाठी व्हॅसलीनचा वापर केला असावा. 80 षटकांनंतरही चेंडू नवीन असल्यासारखा चमकत होता. अंपायरनी हा बॉल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवायला हवा होता."
शब्बीर अहमदने ही पोस्ट करताच तो ट्रोल होण्यास सुरूवात झाली. या आरोपांमुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेक युजर्सनी शोधून शोधून पाकिस्तानी बॉलर्सने केलेल्या गैरकृत्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली. ICC ने सदोष गोलंदाजी अॅक्शनमुळे शब्बीर अहमदवर बंदी घातली होती. त्याचीही आठवण भारतीय क्रिकेटप्रेमींनी करून दिली.
मोहम्मद सिराजची प्रभावी कामगिरी
ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी मोहम्मद सिराजने केलेल्या शानदार गोलंदाजीचे जगभरात कौतुक होत आहे. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती. त्यावेळी सिराजने 25 चेंडूत केवळ 9 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने सामना जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.