Who is Manoj Badale? : आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत अनेक बड्या नावांची चर्चा असते, पण तुम्हाला माहिती आहे का, की या लीगमध्ये एक असा संघ मालक आहे ज्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे? राजस्थान रॉयल्स या यशस्वी टीमचे सर्वेसर्वा मनोज बदाले हे आयपीएलमधील एकमेव मराठी संघ मालक आहेत. धुळे जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज बडाले यांनी शून्यातून विश्व निर्माण करत आज जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
धुळे ते केंब्रिज
मनोज बदाले यांचा जन्म 31 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण ग्रामीण भागात गेले असले तरी पुढील शिक्षणासाठी ते कुटुंबासह इंग्लंडला स्थायिक झाले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या इमॅन्युएल कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. शिक्षणांनंतर त्यांनी मॉनिटर कंपनीत कामाला सुरुवात केली आणि 1998 मध्ये ब्लेनहाईम चाल्कोट या स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी फिनटेक आणि हेल्थटेक क्षेत्रात 40 पेक्षा जास्त स्टार्टअप्स यशस्वीपणे उभे केले आहेत.
( नक्की वाचा : IPL 2026 : मैदानात अनर्थ घडला, पण पुढच्या 11 मिनिटांत जे झालं तो चमत्कारच! एन्गिडीसाठी दिल्ली पोलिसांनी... )
राजस्थान रॉयल्स आणि रणनीतीचा विजय
क्रिकेटच्या मैदानात मनोज बदाले यांची खरी ओळख 2008 मध्ये निर्माण झाली. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात त्यांनी राजस्थान रॉयल्स ही फ्रँचायझी विकत घेतली. त्यावेळी हा संघ इतर टीम्सच्या तुलनेत कमी चर्चेत होता, मात्र बडाले यांनी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवला. त्यांच्या या अचूक रणनीतीमुळे राजस्थान रॉयल्सने पहिल्याच वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. आज इमर्जिंग मीडिया आयपीएल लिमिटेडच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्समध्ये त्यांची 65 टक्के भागीदारी आहे.
जागतिक स्तरावर 'रॉयल्स' ब्रँडची निर्मिती
मनोज बदाले यांनी केवळ भारतापुरते मर्यादित न राहता क्रिकेटचा ग्लोबल ब्रँड तयार केला आहे. आयपीएलसोबतच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील पार्ल रॉयल्स आणि कॅरिबियनमधील बार्बाडोस रॉयल्स या टीम्सही विकत घेतल्या आहेत. व्यावसायिक यशासोबतच त्यांनी समाजकार्यातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना 2018 मध्ये ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) हा अत्यंत मानाचा किताब देऊन गौरविले आहे.
( नक्की वाचा : IPL 2026: एकाही भारतीयाला जे जमलं नाही, ते KL Rahul नं करून दाखवलं; 18 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं )
1330 कोटींची संपत्ती आणि मराठी बाणा
आज मनोज बदाले यांची एकूण संपत्ती सुमारे 1330 कोटी रुपये इतकी आहे. एका मराठी माणसाने सातासमुद्रापार जाऊन आणि जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. धुळ्याच्या मातीतून गेलेला हा माणूस आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये किंगमेकर ठरला आहे.