Champions Trophy 2025 Schedule : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. पाकिस्तान आणि दुबईत ही स्पर्धा होत आहे. टीम इंडियानं सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिलाय. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला. त्यानुसार भारताचे सर्व सामने, सेमी फायनल आणि फायनल दुबईत होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत-पाकिस्तान सामना कधी?
तब्बल आठ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्ताननं केलंय. 19 फेब्रुवारी ते 10 मार्च 2025 दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ टीम सहभागी होणार असून एकूण 15 सामने खेळवले जातील. पाकिस्तानमधील रावळपिंडी, लाहोर आणि कराची या शहरांसह दुबईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल.
पाकिस्तानमधील प्रत्येक शहरात तीन सामने होतील. लाहोरमध्ये या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल होणार आहे. एक सेमी फायनल आणि फायनल दुबईत खेळवली जाईल. भारतीय टीम फायनलसाठी पात्र झाली नाही तर फायनल लढत लाहोरमध्ये होणार आहे. सेमी फायनल आणि फायनलसाठी रिझर्व्ह डे देखील आयसीसीनं निश्चित केलाय.
( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यानं 19 फेब्रुवारी 2025 रोजी या स्पर्धेची सुरुवात होईल. तर भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रविवारी 23 फेब्रुवारी रोजी दुबईत खेळवली जाईल. दोन्ही टीममध्ये यापूर्वी वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये लढत झाली होती. भारतानं त्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता.
टीम इंडियाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश - 20 फ्रेब्रुवारी - दुबई
भारत विरुद्ध पाकिस्तान - 23 फेब्रुवारी - दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 मार्च - दुबई
.................
पहिली सेमी फायनल - 4 मार्च - दुबई
फायनल - 9 मार्च, दुबई ( भारतीय टीम फायनलसाठी पात्र झाली नाही तर फायनल मॅच लाहोरमध्ये होईल.)
चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक पाहा
चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेत 8 टीमची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटात प्रत्येकी चार टीम आहेत.
अ गट - भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड
ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान