ICC World Cup: ओळखा पाहू वर्ल्ड कपचे संपूर्ण स्वरुप कुणासाठी बदलले? आयसीसीच्या निर्णयामागचं खरं गुपित उघड

ICC World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पुन्हा एकदा व्यावसायिकतेचा कळस गाठला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
ICC World Cup: आयसीसीच्या अट्टहासाचं कारण आता स्पष्ट होत आहे.
मुंबई:

ICC World Cup: क्रिकेट जगतातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळणारा अफाट पैसा आणि टीआरपी डोळ्यांसमोर ठेवून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पुन्हा एकदा व्यावसायिकतेचा कळस गाठला आहे. खेळात उत्कंठा वाढवण्याऐवजी केवळ खजिन्याची तिजोरी कशी भरता येईल, हा विचार करून आयसीसीने आगामी वनडे वर्ल्ड कपच्या नियमांमध्ये आणि स्वरूपात मोठे बदल केले आहेत. 

या नव्या रचनेचा थेट फायदा केवळ आणि केवळ भारत-पाकिस्तान सामन्यांची संख्या वाढवण्यासाठी केला जाणार असल्याचे आता उघड झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक जाणकारांनी आयसीसीच्या या नव्या आणि गुंतागुंतीच्या रणनीतीवर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला असून यामुळे नव्या संघांना पुढे येण्याच्या वाटा बंद केल्या जात असल्याची टीका होत आहे.

Advertisement

पैसे कमावण्यासाठी आयसीसीची नवी खेळी

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 संघ खेळणार असल्याचे दाखवण्यात आले असले, तरीही यात एक छुपा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. स्पर्धेतील सर्वात कमी रँकिंग असलेले खालचे 3 संघ आधी आपापसात एक प्राथमिक फेरी खेळतील. 

या 3 पैकी केवळ 1 संघ मुख्य गटात प्रवेश करू शकेल. याचा अर्थ कागदावर 14 संघ असले तरी प्रत्यक्ष मुख्य स्पर्धा फक्त 12 संघांमध्येच रंगणार आहे. मुख्य म्हणजे या 12 संघांचे 6-6 चे दोन गट केले जातील. आयसीसी नेहमीप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवेल, ज्यामुळे या दोन्ही संघांमध्ये स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाईल.

( नक्की वाचा : FIFA World Cup: मेस्सीने ज्याला कडेवर खेळवलं, तोच आता वर्ल्ड कप फायनलमध्ये मेस्सीला रडवणार? अविश्वसनीय गोष्ट )

एकाच वर्ल्ड कपमध्ये तब्बल 3 भारत-पाकिस्तान सामने

या नव्या आराखड्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तब्बल 3 वेळा आमनेसामने येऊ शकतात. पहिल्या साखळी फेरीनंतर अव्वल संघ 'सुपर सेव्हन' या नव्या फेरीत प्रवेश करतील. ही फेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, म्हणजेच इथे प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. 

या टप्प्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळेल. यानंतर सर्वोत्तम 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. तिथे पॉईंट टेबलनुसार किंवा थेट फायनलमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात. एकाच स्पर्धेत 3 वेळा एकाच लढतीची पुनरावृत्ती करून आयसीसी केवळ ब्रॉडकास्टर्स आणि जाहिरातदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : ICC World Cup : आयसीसी बदलणार वनडे आणि टी20 वर्ल्ड कपचा संपूर्ण फॉरमॅट, जाणून घ्या काय आहे नवा खेळ )

आयसीसीची उलटी गंगा

एकीकडे फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सहभागी देशांची संख्या 32 वरून थेट 48 आणि पुढे 64 पर्यंत नेण्याची चर्चा करत आहे, तर दुसरीकडे आयसीसी मात्र क्रिकेटचा विस्तार करण्याऐवजी तो अधिक संकुचित करत आहे. नव्या आणि नवोदित संघांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांच्यासाठी पात्रता फेऱ्यांचे कठीण अडथळे तयार करण्यात आले आहेत. त्यातच बाद फेरीची रोमांचकता वाढवणारे उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) सामने या वर्ल्ड कपमधून हद्दपार करण्यात आले आहेत. केवळ भारत-पाकिस्तान सामन्यांमधून मिळणारा मोठा महसूल डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण स्पर्धेचे स्वरूप एका बाजूला झुकवण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे हे दोन्ही देश 2006 पासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. त्यामुळे केवळ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येच हे दोन संघ एकमेकांशी भिडतात. याच मर्यादांचा व्यावसायिक गैरफायदा घेत आयसीसीने नियमांची ही नवी मोडतोड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

Advertisement

याशिवाय 2028 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही 20 संघ कायम ठेवण्यात आले असले, तरीही तिथे 'सुपर 10' ही नवी संकल्पना आणून बाद फेरीत पोहोचण्याची पद्धत आणखी क्लिष्ट करण्यात आली आहे.
 


Topics mentioned in this article