U-19 World Cup 2026 : पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी आणि वर्ल्ड कपसाठी ज्युनियर क्रिकेट कमिटीने युवा खेळाडूंची निवड केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आयुष म्हात्रे याच्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर विहान मल्होत्रा उपकर्णधार असेल. झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये रंगणाऱ्या या महाकुंभासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
वर्ल्ड कपचे पूर्ण वेळापत्रक
या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार असून त्यांची चार ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ ग्रुप B मध्ये असून त्याच्यासोबत न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश या टीम्स आहेत.
भारताची पहिली लढत 15 जानेवारी रोजी अमेरिकेविरुद्ध बुलावायो येथे होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीला बांगलादेशशी आणि 24 जानेवारीला न्यूझीलंडशी भारताचे सामने होतील. साखळी फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर टीम सुपर सिक्स, सेमी फायनल आणि त्यानंतर फायनलच्या दिशेने प्रवास करेल.
( नक्की वाचा : VIDEO : 'मी स्वतः येऊन तुझं गळा दाबेन', गावस्कर सचिनला असं का म्हणाले होते? तेंडुलकरचं सडेतोड उत्तर! )
दक्षिण आफ्रिका दौरा आणि दुखापतींचे संकट
वर्ल्ड कपपूर्वी सराव म्हणून भारतीय अंडर-19 संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. बेनोनीमध्ये तीन वन-डे मॅचेसची सीरिज खेळली जाईल. मात्र, या सीरिजमध्ये नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा खेळू शकणार नाहीत.
या दोघांच्याही हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून ते सध्या BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत आहेत. हे दोन्ही खेळाडू थेट वर्ल्ड कपसाठी टीममध्ये सामील होतील. त्यांच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपसाठी असा आहे भारतीय संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह (विकेटकीपर), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह आणि उद्धव मोहन.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेली टीम
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह (विकेटकीपर), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.